Tuesday 1 January 2013

फलक घेऊन ‘ती’ एकटीच चार तास उभी

फलक घेऊन ‘ती’ एकटीच चार तास उभी: - पीडित तरुणीसाठी न्यायासाठी शहरवासीयांची उदासीनता
पिंपरी । दि. ३0 (प्रतिनिधी)

दिल्लीतील सामूहिक बलात्कारपीडित तरुणीच्या मृत्यूमुळे देशभर संताप व्यक्त होत असताना शहरातील नागरिक त्याला अपवाद ठरत असल्याचा प्रत्यय गेल्या दोन दिवसांत आला. भोसरीतील एक तरुणी ‘वुई वॉन्ट जस्टीस’ असा फलक घेऊन पिंपरीतील डॉ. आंबेडकर चौकात तब्ब्ल चार तास एकटीच उभी होती. परंतु तिच्या आंदोलनाकडे केवळ कुतूहल म्हणून पाहण्यातच धन्यता मानली गेली. काही महिला लोकप्रतिनिधींनी भेट घेऊन पाठिंबा दर्शविण्याचा प्रयत्न केला. परंतु तोही प्रामाणिकतेपेक्षा फार्सच अधिक ठरला.

तथाकथित सामाजिक कायकर्ते, राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी चौकात सातत्याने आंदोलन करतात. पण, दिल्लीतील पीडित तरुणीच्या न्यायासाठी देशभर आंदोलन सुरू असताना रस्त्यांवर उतरावे, असे फारसे कोणाला वाटले नाही. भोसरीत राहणारी व हिंजवडीतील कंपनीत नोकरी करणारी शीतल जुनगडे मात्र या मानसिकतेला अपवाद ठरली.

सकाळी नऊलाच ती चौकात हजर झाली. हातात ‘वुई वॉन्ट जस्टिस’ असा फलक घेऊन ती शांतपणे उभी राहिली. ये-जा करणारे तिचे आंदोलन पाहून निघून जात होते. एकट्या तरुणीने रस्त्यावर उतरून दाखविलेल्या धाडसाला काही क्षण थांबून आपणही प्रोत्साहन द्यावे, असे कोणाला वाटले नाही. दुपारी एकच्या सुमारास महात्मा फुले महाविद्यालयातील प्रवीण उबाळे आणि धीरज भंडारी हे बारावीचे दोन विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले. ‘दामिनी को न्याय दो’ आणि ‘गुन्हेगारांना फाशी द्या’ अशा मागणीचे फलक त्यांच्या हातात होते. काही लोकप्रतिनिधी आल्या आणि आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगून काही वेळाने निघून गेल्या. सायं. ५ ला आंदोलन संपले. कासारवाडीतील बालिकेवर बलात्कार करून तिचा निर्दयीपणे खून केल्याची घटना ताजी असताना त्याबाबत आवाज न उठविणार्‍या लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांची उदासीनता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली.

No comments:

Post a Comment