Monday 12 November 2012

महापालिकेला पुरस्कार, अहवालात रस

महापालिकेला पुरस्कार, अहवालात रस: पिंपरी । दि. ४ (प्रतिनिधी)

महापालिकेला केवळ स्वच्छता व पर्यावरण विषयक पुरस्कार मिळविण्यात स्वारस्य असून केवळ पर्यावरण अहवाल पर्यावरण प्रकाशित करण्यापुरताच पर्यावरण विभाग कार्यरत असल्याचे दिसते. हा अहवालही मागील पानावरून पुढे असाच असतो. आरोग्य आणि पर्यावरण विषयक प्रश्नांची जाण आणि भान येथील प्रशासन व राज्यकर्त्यांना नसल्याने समस्या वाढतच चाललेल्या आहेत.

सार्वजनिक स्वच्छता, नागरी आरोग्य पर्यावरण विषयक काम करणार्‍या संस्था शहरात हाताच्या बोटावर मोजण्याएवढय़ाच आहेत. खासगी संस्थांचा पुढाकार अधिक असल्याचे जाणवते. मात्र, शासकीय अनुदान मिळत नसल्याने त्यांनाही र्मयादा पडत आहेत. पर्यावरण संवर्धन समिती, पवना नदीसुधार मंच, नदी विकास मंच, इंद्रायणी बचाव कृती समिती, मुळा विकास मंच या संस्था पर्यावरणविषयक काम करीत आहेत. तर गणेशोत्सवाच्या काळात नदी प्रदूषित होऊ नये, निर्माल्य दान याविषयी संस्कार प्रतिष्ठान, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, स्वकाम, अनिरुद्ध बापू धार्मिक संस्था, संत निरंकारी मंडळ यांचा पुढाकार असतो.

मनपाच्या पर्यावरण विभागाने गेल्या काही वर्षांत कोणते मोठे अभियान घेऊन जागृती किंवा भरीव योगदान दिले, असे दिसलेले नाही. पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल गेल्या पाच वर्षांत प्रकाशितच झालेला नाही. आरोग्य समस्येचे तीन तेरा वाजले असताना केवळ कागदी घोडे नाचवून मनपाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाची बक्षिसे पटकाविली. विरोधी पक्ष स्वच्छतेविषयी अनेकदा आवाज उठवितो. मात्र, सत्ताधार्‍यांनी त्याकडे दुर्लक्षच केले आहे.

स्वच्छतेच्या ठेक्याकडेच लक्ष
नेत्यांशी संबंधित संस्था केवळ देखावा म्हणून स्वच्छता, जागृती केल्याचे भासवीत असतात किंवा स्वच्छतेच्या कामाचा ठेका कसा मिळेल, याकडे लक्ष देत असतात. काही संस्था प्रसिद्धीसाठी काम करीत असल्याचे दिसून येते. समस्येला वाचा फोडण्यात पुढाकार असला, तरी दुर्दैवाने ते पत्रकबाजीला अधिक महत्त्व देत असल्याचे दिसते. मात्र, यातून काही अंशी का होईना सामाजिक भान दिसते.

No comments:

Post a Comment