- क्रांतिदिनानिमित्त फेरीवाला क्रांती महासंघाचे आंदोलन
पिंपरी : महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे कष्टकर्यांना स्वस्त घरांच्या मागणीसाठी प्राधिकरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
शुक्रवारी होणार्या क्रांतिदिनानिमित्त मोर्चा काढण्यात आला. टिळक चौक (निगडी) येथून क्रांतिवीर भगतसिंग व लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास ज्येष्ठ कष्टकरी अनसूया भोमे, विठ्ठल कड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून क्रांतिज्योत पेटवून मोर्चाला सुरुवात झाली.
भेळ चौक, संभाजी चौक, आकुर्डी रेल्वे स्टेशनहून प्राधिकरण कार्यालयावर आला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी नेतृत्व केले. नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, जागरूक नागरिक संघटनेचे डॉ. सुरेश बेरी यांनी पाठिंबा दिला.
या वेळी महिलाध्यक्षा अंजना गुंड, संघटक अनिल बारवकर, वृषाली पाटणे, मनीषा राऊत, वहिदा शेख, सुनंदा चिखले, नीलेश सुंभे, गणेश जगताप, प्रभाकर मुळे, अंबादास जावळे, तुषार घाटुळे, राजू बिराजदार, प्रकाश साळवे, धन्यकुमार वास्ते, अनिल मदिंलकर, ज्ञानदेव लगाडे, राम बिरादार, अरुण वाणी, राजू जाधव, आदी उपस्थित होते.
शिष्टमंडळाने स्वस्त घराचे व हॉकर्स झोनच्या मागण्यांचे निवेदन उप मुख्यकार्यकारी अधिकारी कल्याण पांढरे, स्नेहल भोसले, तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देऊन चर्चा केली. आपले म्हणणे व मागण्याबाबत डॉ. योगेश म्हसे यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. (प्रतिनिधी)
मुळात सामान्यांसाठी स्थापलेल्या प्राधिकरणाची भूमिका आता बदलली असून बिल्डर, धनिकांसाठी काम करीत आहे. १९९0 पासून प्राधिकरणाने स्वस्त घरांच्या योजना बंद केल्या आहेत. त्या झाल्या असत्या, तर अनधिकृत बांधकामे झालीच नसती.
- काशिनाथ नखाते, अध्यक्ष, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ
प्राधिकरणाने मागील काही वर्षांचा तुटवडा भरून काढण्यासाठी यापुढे काही वर्षे १00% योजना गरिबांसाठी राबवाव्यात. प्राधिकरणाकडून होत असलेली जनतेची दिशाभूल थांबवावी.
- मानव कांबळे, अध्यक्ष, नागरी हक्क सुरक्षा समिती