पिंपरी - शहरातील पदपथांची मालकी महापालिकेकडे असली, तरी म्हाळसाकांत चौक आणि संभाजी चौक येथील पदपथांचा ताबा मात्र फेरीवाल्यांकडेच आहे.
पदपथावर चालण्याचा प्रथम हक्क पादचाऱ्याचा आहे, असे उच्च न्यायालयाने यापूर्वीच आपल्या निकालात सांगितले आहे. मात्र शहरात फिरताना महापालिकेकडून याचे पालन झालेले दिसत नाही. म्हाळसाकांत चौकात शाळेच्या बाहेर पदपथ फेरीवाल्यांनी व्यापला आहे. पदपथावर टपऱ्या असून, काहीजण रस्त्यावरही आपले सामान ठेवतात; तसेच पदपथालगत दुचाकी पार्क केलेल्या असतात. शाळा सुटण्याच्यावेळी शाळेच्या बस व पालकांच्या चारचाकी उभ्या असतात. यामुळे जेमतेम एक वाहनच येथून जाऊ शकते. ऐन गर्दीच्यावेळी विद्यार्थी व पालकांना वाहनांच्या गर्दीतून चालावे लागते.