Sunday, 2 December 2012

दिल्लीच्या कार्यक्रमासाठी महापालिकेची 'स्पॉन्सरशीप'

दिल्लीच्या कार्यक्रमासाठी महापालिकेची 'स्पॉन्सरशीप'
पिंपरी, 1 डिसेंबर
दिल्ली येथे इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन ट्रान्सपोर्ट यांच्या वतीने भरविल्या जाणा-या 'अर्बन मोबिलीटी इंडिया' या परिषदेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने मुख्य प्रायोजकत्व (स्पॉन्सरशीप) स्विकारले आहे. त्यासाठी महापालिका सात लाख रुपये मोजणार असून आज (शनिवारी) झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये या खर्चाला मंजुरी देण्यात आली.

अध्यक्षस्थानी जगदीश शेट्टी होते. इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन ट्रान्सपोर्ट यांच्या वतीने नवी दिल्ली येथे 5 ते 8 डिसेंबर या कालावधीत 'अर्बन मोबिलीटी इंडिया' या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात शहरी वाहतुकीबाबतचे प्रदर्शन आणि परिसंवाद होणार आहे.

महापालिका जेएनएनयुआरएम अंतर्गत शहरात अर्बन ट्रान्सपोर्टबाबत प्रकल्प राबवित आहे. त्यामुळे महापालिकेने या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजकत्व स्विकारले आहे. त्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन ट्रान्सपोर्ट यांना सात लाख रुपयांचा खर्च अदा करण्याच्या आयत्यावेळच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
याखेरीज महापालिकेच्या वतीने येत्या जानेवारी महिन्यात पिंपरीतील एच.ए. मैदानावर पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी येणा-या पन्नास लाखाच्या खर्चासह विविध विकास कामांसाठी सुमारे 26 कोटी 31 लाखाच्या खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली. बस खरेदीसाठी पाच कोटी 16 लाख 37 हजार रूपये महापालिकेने उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी पुणे महानगर परिवहन महामंळाने (पीएमपीएमएल) केली होती. त्यासही मंजुरी देण्यात आली. भोसरीतील सर्व्हे क्रमांक एकमधील महापालिकेच्या ताब्यात आलेले आरक्षण विकसित करण्यासाठी येणा-या सुमारे तीन कोटी रूपयांच्या खर्चाचाही त्यात समावेश आहे.
बालवाडीताईंच्या मानधनात वाढ

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नियंत्रणाखाली 221 बालवाडीताई आणि समन्वयक कार्यरत आहेत. वाढत्या महागाईमुळे मानधनात वाढ करण्याची मागणी त्यांच्याकडून सातत्याने होत होती. अखेर आजच्या स्थायी समितीच्या सभेमध्ये बालवाडीताईंच्या मानधनात दरमहा पाचशे तर समन्वयकांच्या मानधनात एक हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

निगडीतील आधार केंद्रात बालिका दाखल

निगडीतील आधार केंद्रात बालिका दाखल:
निगडी येथील आधार केंद्रात २५ नोव्हेंबर रोजी पोलिसांमार्फत आणि बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार एक बालिका दाखल झाली आहे. ही बालिका पोलिसांना भोसरीतील संत ज्ञानेश्वर भाजी मंडईत २४ नोव्हेंबरला रात्री सव्वाअकरा वाजता सापडली. या वेळी तिचे अंदाजे वय पाच दिवस होते. आधार केंद्रातील कार्यकर्त्यां ज्योती देव यांनी ही माहिती दिली आहे.  ओळखीसाठी या बालिकेचे नाव आर्या ठेवले आहे. तिचा रंग सावळा व चेहरा गोल आहे. या बालिकेच्या आई-वडिलांनी अथवा नातेवाइकांनी 'आधार- प्लॉट क्र. ४७ / ४८, विभाग क्र. २७, जनता वसाहत निगडी, पुणे- ४४' किंवा 'बाल कल्याण समिती- शिवाजीनगर, पुणे- ५' या पत्त्यांवर संपर्क साधावा. ०२०- २७६५६२५७ आणि ०२०- २५५३५३३४ हे दूरध्वनी क्रमांकही संपर्कासाठी उपलब्ध आहेत.      

Fearing another attack, Bhosari continues to live on edge

Fearing another attack, Bhosari continues to live on edge: Two days after a murder rocked Dhavadevasti area of Bhosari, leading to tension, things seemed to be limping back to normal in the suburb.

शेतक-यांचा थेट माल विक्रीला उत्तम प्रतिसाद

शेतक-यांचा थेट माल विक्रीला उत्तम प्रतिसाद
पिंपरी, 1 डिसेंबर
राज्यात नाशवंत शेतमालावर सरसकट सहा टक्के आडत आकारण्याच्या राज्यशासनाच्या निर्णया विरोधात आडत व्यापा-यांनी संप पुकारला आहे. मात्र पिंपरी उपबाजार समितीने आजपासून (शनिवार) सुरू केलेल्या शेतकरी ते ग्राहक अशा थेट माल विक्रीला शेतक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

याबाबत अधिक माहिती देताना बाजार समितीच्या पिंपरी-चिंचवड उपबाजार विभागप्रमुख एन. डी. घुले म्हणाले की, आडत व्यापा-यांनी जरी संप पुकारला असला तरी बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांच्या आदेशानुसार शेतक-यांचे नुकसान होऊ नये यासाठी पिंपरी आणि चिंचवड याठिकाणी शेतक-यांचा शेतमाल विकण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

या दोन्ही ठिकाणी शेतक-यांचा शेतमाल विक्रीला उत्तम प्रतिसाद मिळाला. संप असलातरी आज मार्केटमध्ये मालाची चांगली आवक झाली होती. फळ आणि भाजीपाळ्याची 111 क्विंटल, तर एक लाख बार हजार पालेभाज्यांची आवाक झाली. शिवाय शेतक-यांच्या मालावर कोणतीही आडत न घेता शेतक-यांना रोखीने पैसे देण्यात आले. फुलबाजारात देखिल फुलांची चांगली आवक झाली. त्यामुळे या संपाचा काही परिणाम शेतमालावर झाला नाही. उलट शेतक-यांना चांगला फायदा मिळाला.

शेतक-यांनी कोणालाही न घाबरत आपला शेतमाल पिंपरी व चिंचवड भाजी मंडई येथे घेऊन यावा. भाजीपाला अथवा फळे याबाबत काही अडचणी असल्यास नीलेश लोखंडे (9011115656) व फुल शेतक-यांनी राजू शिंदे (9860562404) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन एन. डी. घुले यांनी केले आहे.

भाऊसाहेब भोईर यांचा 'मोकळा श्वास` सात डिसेंबरपासून

भाऊसाहेब भोईर यांचा 'मोकळा श्वास` सात डिसेंबरपासून
पिंपरी, 1 डिसेंबर
स्त्री भ्रृण हत्या या ज्वलंत विषयावर आधारित 'मोकळा श्वास` हा मराठी चित्रपट येत्या सात डिसेंबरला राज्यभर प्रदर्शित होत असल्याची माहिती काँगेस शहराध्यक्ष तथा निर्माता भाऊसाहेब भोईर यांनी शनिवारी दिली.
सामाजिक विषय डोळ्यासमोर या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून या चित्रपटाचे 70 टक्के चित्रीकरण पिंपरी-चिंचवड शहरात झाले असल्याचे भोईर म्हणाले.
कांचन अधिकारी दिग्दर्शित या चित्रपटात ज्येष्ठ कलाकर शरद पोंक्षे, प्रतीक्षा लोणकर, मृण्मयी देशपांडे, नेहा गद्रे, ज्योती सुभाष, चिन्मय मंडलेकर हे प्रमुख भूमिकेत आहेत. मोहन जोशी, माधवी गोगटे, रजनी वेलणकर हे पाहुणे कलाकार आहे. तसेच गौरी लोंढे, किरण येवलेकर, आरती शुक्रे, विनिता संचेती या स्थानिक कलाकारांनाही या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे.
येत्या सात डिसेंबरला (शुक्रवार) हा चित्रपट राज्यभर प्रदर्शित होत असून प्रेक्षकांनी हा चित्रपट पहावा असे आवाहन भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांना हा चित्रपट पाहता यावा यासाठी शहरातील महिला बचत गटांना पन्नास टक्के सवलतीच्या दरात हा चित्रपट दाखविण्यात येणार असल्याचेही भोईर यांनी सांगितले. सवलतीच्या दरातील तिकिटे मिळविण्यासाठी 9822313066 व 9890085796 या क्रमांकावर संपर्क साधावा.

हिंजवडीमध्ये एक दिवसाचे स्त्री अर्भक सापडले

हिंजवडीमध्ये एक दिवसाचे स्त्री अर्भक सापडले

पिंपरी, 1 डिसेंबर
हिंजवडीतील वसंतोत्सव हौसिंग सोसायटीजळील कचरा कुंडीजवळ एक दिवसांचे जिवंत स्त्री अर्भक आढळले. शनिवारी (दि. 1) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंतोत्सव हौसिंग सोसायटीच्या कचराकुंडीजवळ एक दिवसांचे स्त्री अर्भक आढळले. याबाबत एका अनोळखी व्यक्तीने पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन या स्त्री अर्भकाला एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी हलविले. प्राथमिक उपचारानंतर या अर्भकाला पिंपरीतील महापालिकेच्या यशवंतराव चव्हण रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

शिक्षण हक्का'च्या सभेला नगरसेवकांची दांडी !

'शिक्षण हक्का'च्या सभेला नगरसेवकांची दांडी !
पिंपरी, 1 डिसेंबर
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क जाणून घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने आयोजित केलेल्या विशेष सभेला सर्वपक्षीय नगरसेवकांनी दांडी मारली. सभेला अवघे 25 टक्केच नगरसेवक उपस्थित होते. विशेष म्हणजे नगरसेविका बहुसंख्येने उपस्थित होत्या. मात्र नगरसेवकांनी उदासिनता दाखविली. त्यातच 'शिक्षण हक्क' कायद्याऐवजी शाळांच्या दुरवस्था, शिक्षणाच्या दर्जावर नगरसेवक घसरल्याने महापौरांनी सभेचे सोपस्कार कसेबसे पूर्ण केले.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्काबाबतच्या कायद्याची सविस्तर माहिती देण्यासाठी शासनाच्या आदेशाप्रमाणे व महापालिका शिक्षण मंडळाच्या पुढाकाराने आज (शनिवारी) विशेष सभा घेण्यात आली. महापौर मोहिनी लांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला राज्य शासनाच्या शिक्षण विभागाचे सहसंचालक गोविंद नांदेडे, एसएससी बोर्डाच्या सचिव पुष्पलता पवार, महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी, शिक्षण मंडळाचे सभापती विजय लोखंडे, अतिरीक्त आयुक्त प्रकाश कदम, सहआयुक्त अजीज कारचे पीठासनावर उपस्थित होते.

सभेसाठी दुपारी दोनची वेळ देण्यात आली होती. मात्र सभेच्या सुरुवातीला केवळ शिक्षण मंडळ सदस्य आणि बोटावर मोजण्याइतकेच नगरसेवक उपस्थित असल्याने सभा पंधरा मिनिटे उशिराने सुरु झाली. तरीही गर्दी वाढत नसल्याचे पाहून महापौर लांडे यांनी दिवंगत पंतप्रधान इंदलकुमार गुजराल यांना श्रध्दांजली अर्पण करुन दहा मिनिटांसाठी सभा तहकूब करण्यात येत असल्याचे जाहीर केले. दहा मिनिटानंतर सभा सुरु झाल्यावरही मोजक्याच नगरसेवकांची भर सभेत पडली. काही नगरसेवक केवळ हजेरीपुरते आले अन् गेले.

मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्काबाबतच्या कायद्याबाबत बोलण्याऐवजी शाळांची दुरावस्था, खासगी शाळांची मनमानी याविषयी नगरसेवकांनी टीकेची झोड उठविली. सभेचा रंग बदलत असल्याचे पाहून महापौरांनी थोडक्यात बोला, विषयावर बोला असे सांगत बजावत चर्चा 'ट्रॅक'वर आणली. सत्तारुढ पक्षनेत्या मंगला कदम, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, जावेद शेख, जितेंद्र ननावरे, उल्हास शेट्टी, रामदास बोकड, विलास नांदगुडे, सीमा सावळे, सुलभा उबाळे, भारती फरांदे, अरुण बो-हाडे तसेच शिक्षण मंडळ सदस्य गोरक्ष लोखंडे, नाना शिवले यांनी चर्चेत भाग घेतला.

मोफत शिक्षण कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक निधी खर्च करावा, अशी अपेक्षा जावेद शेख यांनी व्यक्त केली. शिक्षक भरती होताना लेखी परिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी जितेंद्र ननावरे यांनी केली. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्काबाबतचा कायदा स्वागतार्ह असल्याचे सभापती लोखंडे यांनी सांगितले. सक्तीचे शिक्षण कायद्याची व्याप्ती वाढवावी, शैक्षणिक दर्जा सुधारण्यावर भर द्यावा, विशेष मुलांसाठी शासनाने आणि महापालिकेने विभागवार शाळा सुरु कराव्यात तसेच शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबवावी अशा सूचना सर्ववपक्षिय सदस्यांनी केल्या.

चर्चेनंतर महापौर लांडे म्हणाल्या की, शिक्षणासाठी महात्मा फुले यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्याचे फलित व्हावे यासाठी प्रत्येकाने शिकले पाहिजे. महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अधिकाधिक सुविधा पुरविल्या जातील, त्या-त्या भागातील लोकप्रतिनिधी आणि शिक्षकांनीही शाळांकडे लक्ष दिले पाहिजे. ज्या भागात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. तेथील मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे. ज्याठिकाणी जवळपास शाळा नाहीत तेथे शाळा सुरु करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची क्षमता करण्यासाठी परिक्षा घेणे आवश्यक असल्याचे महापौरांनी सांगितले.

गोविंद नांदे़डे यांनी मोफत शिक्षण कायद्याविषयीची माहिती दिली. याबाबत अधिक मार्गदर्शन केले. आयुक्त डॉ. परदेशी यांनी प्रास्ताविक केले.

पिंपरी-चिंचवड शहरात दोन जणांची आत्महत्या

पिंपरी-चिंचवड शहरात दोन जणांची आत्महत्या
पिंपरी, 1 डिसेंबर
पिंपरी-चिंचवड शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी राहत्या घरात छताच्या हुकाला गळफास लावून तरूण-तरूणींनी आत्महत्या केली. चिखली आणि खराळवाडी येथे शनिवारी (दि. 1) दुपारी या घटना उघडकीस आल्या. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

पंकज मदन तायडे (वय-23, रा. नंदनवन सोसायटी, मोरेवस्ती, चिखली, मूळ - जळगाव) व रोहिणी तुळशीदास शिंदे (वय-24, रा. खराळवाडी, पिंपरी) अशी या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज हा चार महिन्यांपासून टाटा मोटर्स कंपनीत मशिन ऑपरेटरमधून काम करतो. चिखलीत दोन-तीन मित्र घरात एकत्र राहतात. रूमपार्टनर योगेश ठोसर हे घराबाहेर गेले होते. आज दुपारी अडीच वाजता घरात कोणी नसल्याचे पाहून पंकज याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.

खराळवाडी येथे घरात आई-वडील नसल्याचे पाहून रोहिणी शिंदे हिने दुपारी दीड वाजता राहत्या घरात छताच्या हुकाला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावला. रोहिणी अविवाहित असून, ती शिक्षण घेत आहेत.
दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.



चिंचवडच्या जुईली पटवर्धनचे जागतिक योग स्पर्धेत यश

चिंचवडच्या जुईली पटवर्धनचे जागतिक योग स्पर्धेत यश
पिंपरी, 1 डिसेंबर
इंटरनॅशनल योगा फेडरेशनने आयोजित केलेल्या 24 व्या वर्ल्ड योगा चॅम्पियनशिप स्पर्धेत चिंचवड येथील जुईली सचिन पटवर्धन या अवघ्या 13 वर्षाच्या चिमुरडीने एक सुवर्ण व चार रौप्यपदकके पटकावीत नेत्रदीपक यश मिळविले आहे. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या स्पर्धकांना पराभूत करत तिने हे यश संपादन केलं आहे.

इंटरनॅशनल योगा फेडरेशनतर्फे आयोजित करण्यात आलेली 24 वी वर्ल्ड योगा चॅम्पियनशिप 2012 ही स्पर्धा 23 व 24 नोव्हेंबरला रशियाची राजधानी मॉस्को येथे पार पडली. ही स्पर्धा केवळ दोन गटात घेतली जाते. 17 वर्षावरील व 17 वर्षाखालील गटात ही स्पर्धा घेतली गेली. या स्पर्धेत रशिया, इराण, इराक, बल्जेरीया, चायना, हाँगकाँग आदी देशांच्या योगपटुंनी सहभाग घेतला होता. भारतातून या स्पर्धेत 32 जणांच्या संघात चिंचवड येथील 13 वर्षाची चिमुरडीही होती. ही स्पर्धा एकूण पाच विभागात होते. आणि या पाचही विभागात जुईलीने नेत्रदीपक यश संपादन केलं आहे. रिदमीक योगा स्पर्धेत सुवर्ण, डान्स योगा, आर्टीस्टीक योगा, योगासन स्पर्धा व अथलेटीक्स योगा या विभागात तिने रौप्यपदकाची कमाई केली आहे.

जुईलीला देशासाठी काही तरी मिळवायचे होते. हे तिने अवघ्या 13 व्या वर्षीच करून दाखवले. तिचे यश इतरांना प्रेरणादायी आहे. ही पदके तिने आजी, आई-वडील व सर्व कुटुंबीयांना अर्पण केली.

जुईलीचे वडील सचिन पटवर्धन हे पिंपरी-चिंचवडमधील प्रख्यात वकील आहेत तर आई अश्विनी गृहिणी आहे. जुईली ही ग्लोबल इंटरनॅशनल स्कुल या शाळेची इयत्ता सातवीतील विद्यार्थीनी आहे. योगाकडे लक्ष देतांना तिने शालेय परीक्षांमध्येही घवघवीत यश संपादन केले आहे. जुईली वयाच्या आठव्या वर्षापासून योगा शिकत आहे. सुरवातीला तिच्या प्रशिक्षिका मनाली घारपुरे-देव यांनी फिटनेसकडे लक्ष दिले मात्र तिची वेगात होत असलेली प्रगती पाहुन त्यांनी तिला राष्ट्रीय स्पर्धांसाठी तयार करण्यास सुरवात केली.

त्यानंतर तिने अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेत यशही मिळवले. या स्पर्धेसाठी तिने दिवाळी व परीक्षांच्या काळातही योगासाठी वेळ काढून पूर्वतयारी करत संपादन केले आहे. या स्पर्धेसाठी हरियाणातील पंचकुला येथे सर्व स्पर्धकांना मार्गदर्शनही करण्यात आले. त्यानंतर 21 नोव्हेंबरला सर्वजण मॉस्कोला रवाना झाले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची ही तिची पहिलीच वेळ असली तरी आलेल्या दडपणावर मात करत तिने जिद्दीने घवघवीत यश संपादन केले आहे.

रशियातील स्पर्धेला पदकांची लयलूट करून जुईली नुकतीच चिंचवडला परत आली. त्यावेळी चिंचवड येथील घरी तिचं जल्लोषात स्वागत करण्यात आले. चिमुरड्या जुईलीने भारत देशाबरोबरच पिंपरी-चिंचवड शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.



एड्स प्रतिबंधक लस विकसित करण्यात ब-यापैकी यश

एड्स प्रतिबंधक लस विकसित करण्यात ब-यापैकी यश
पिंपरी, 1 डिसेंबर
पिंपरी-चिंचवडमधील भोसरीच्या राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था अर्थात नारी मार्फत एड्स नियंत्रण व प्रतिबंधासाठी 1992 पासून जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. या संस्थेत एड्स प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी गेली सात वर्षं संशोधन सुरु आहे. नारीने विकसित केलेली पहिली एड्स प्रतिबंधक लस फारशी परिणामकारक नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, विकसित केलेल्या दुस-या लशीला मात्र प्रत्यक्ष चाचण्यांना समाधानकारक प्रतिसाद मिळत असल्याने शास्त्रज्ञांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. या प्रयत्नांनाना लवकरच यश मिळेल, अशी आशा आज जागतिक एड्स दिनाच्या पार्श्वभूमीवर नारीच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली.

जागतिक एड्स दिनानिमित्त एड्सवर नारी या संस्थेत होत असलेले प्रयोग, त्यांना मिळणारे यश व एड्स नियंत्रण व प्रतिबंध याबाबत प्रचार व प्रसारासाठी आज ओपन हाऊसचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एड्सवर प्रदर्शनही भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात एचआयव्ही आणि त्यावरील औषधांची माहितीही देण्यात आली होती. आज सुमारे दोन हजार नागरिकांनी नारीच्या प्रयोगशाळेला भेट देऊन तेथील तपासणी व उपचारांची माहितीही घेतली. यावेळी एड्स प्रश्नमंजुषेचे आयोजनही करण्यात आले होते.

एड्सचा प्रसार रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या भारतीय आर्युविज्ञान संशोधन परिषद आणि भारत सरकारच्या आरोग्य खात्याच्या अधिपत्याखाली एचआयव्ही एड्सवर संशोधन करणारी राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था ही पिंपरी-चिंचवडमध्ये 1992 मध्ये स्थापन करण्यात आली. एचआयव्हीची लागण रोखण्यास मदत होऊ शकणा-या पद्धती, एचआयव्हीबाधित रुग्णांनी घ्यावयाची काळजी त्याचप्रमाणे एचआयव्ही विषाणूंच्या जैविकतेबद्दल माहिती यावर या संस्थेमधील संशोधन केंद्रीत केले आहे. नारी ही संस्था राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाला तांत्रिक बाबतीत मदत करते. नारी या संस्थेत 2005 पासून एड्स प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी संशोधन सुरू आहे. त्याशिवाय अँटी रेट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) सेंटरद्वारे एड्सचा प्रसार रोखला जावा यासाठीही प्रयत्न केले जातात. 'शून्याकडे वाटचाल आणि जे आत्तापर्यंत कमावलेले आहे ते भक्क्म करण्यास कटीबद्ध आहोत' हे नारीचे घोषवाक्यच आहे.

एड्स प्रतिबंधक लस विकसित करताना आतापर्यंत दोन वेगवेगळ्या संशोधनांना काही प्रमाणात यश मिळाले आहे. सुरवातीला देण्यात आलेली लस ही अपेक्षेपेक्षा खूप कमी प्रमाणात काम करत होती. त्यामुळे नंतर आणखी प्रयोग करुन अडव्हॅक्स आणि एमव्हीए सारख्या लशी विकसित करण्यात आल्या. या प्रयत्नांना मात्र काही प्रमाणात यश मिळाले आहे. पुणे आणि चेन्नई येथे हे प्रयोग करण्यात आले. यात 32 जणांचे दोनगट करण्यात आला होता. 18 ते 49 या वयोगटातील स्त्री-पुरुषांवर हे प्रयोग करण्यात आले. या प्रत्यक्ष चाचण्यांना मिळालेला प्रतिसाद हा नारीच्या शास्त्रज्ञांचा उत्साह वाढविणारा आहे.

एआरटी सेंटरच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार केले जातात. या संशोधनात एड्सचा प्रसार होण्यास रोखणारी औषधे विकसीत करण्यात आल्याचा दावाही डॉ. मनीषा घाटे यांनी केला. डॉ. घाटे म्हणाल्या की, पती आणि पत्नी यापैकी एखाद्याला एचआयव्हीची बाधा झाली असली तर त्याचा जोडीदाराला संसर्ग होणार नाही, अशी औषधेही विकसीत करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.

अनेकदा औषधांना विषाणु दाद देत नाही. अशा विषाणुंना ड्रग रेझीस्टंट म्हणुन त्याची वेगळी तपासणी करुन त्यांना वेगळी औषधे दिली जातात. पहिल्या टप्प्यात एनएनआरटीए व एनआयटीए सारखी औषधे दिली जातात. मात्र या औषधांचा विषाणुंवर काहीही परिणाम होत नसेल तर या औषधांची मात्रा वाढवुन दिली जाते. याची तपासणी देशातील प्रमुख शहरातील संस्थांमध्ये केली जात असल्याचे शास्त्रज्ञ डॉ. संदीप त्रिपाठी यांनी सांगितलं.

जागतिक एड्स दिनानिमित्त नारी संस्थेत आयोजित केलेल्या प्रदर्शनाला सुमारे दोन हजार जणांनी भेट दिली. त्यात विद्यार्थी व विद्यार्थिनींचा संख्या लक्षणीय होती.

एचआयव्ही एड्स प्रतिबंधक लस आता दृष्टीपथात आली आहे. प्रत्यक्ष चाचण्यांमधून लशीच्या प्रभावाची खातरजमा झाल्यानंतर तसेच आवश्यक त्या कायदेशीर बाबींची पूर्तता करून ही लस बाजारात उपलब्ध होऊ शकणार आहे. एचआयव्हीच्या संकटानं धास्तावलेल्या समाजाला ही निश्चितच मोठा दिलासा देणारी बाब आहे.