पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांना आवश्यक असणार्या पाण्याच्या आरक्षणासाठी आज मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत दोन्ही शहरांना लोकसंख्येच्या तुलनेत किती पाणी आरक्षित ठेवणे आवश्यक आहे, याची माहिती घेण्यात येणार असून, पाटबंधारे विभागाच्या प्रधान सचिवांनी ही तातडीची बैठक बोलाविली आहे.
सध्या शहराची लोकसंख्या ४५ लाखांच्या आसपास पोहोचली आहे. या लोकसंख्येस पुरेसे पाणी देण्यासाठी महापालिकेस दरवर्षी सुमारे १६ टीएमसी पाण्याची गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात पाटबंधारे विभागाशी झालेला पाणीवाटपाचा जुना करार हा ११.५ टीएमसीचा आहे. हा करार २0११ मध्येच संपला असून, अजूनही त्यानुसारच शहरास पाणी देण्यात येत आहे. त्यामुळे या बैठकीत शहराची सद्यस्थिती मांडून वाढीव पाण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहरास पवना धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. शहराची लोकसंख्या १७ लाखांच्या आसपास असून, सध्या वर्षास साडेचार टीएमसी पाणी दिले जाते.