पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली थांबविण्यासाठी सर्व राजकीय पक्षाबरोबरच फेसबुक, ट्विटर, वॉट्स अपसारखे सोशल मीडिया सरसावलेला दिसत आहे. काही दिवसांत हजारो "लाइक' आणि शेकडो "कॉमेंट्स' सोशल मीडियावर जागृत नागरिकांनी केल्याने आता तरी बदली रद्द करा; अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा नेटिझन्सनी दिला आहे. पुण्यातील "इंडिया अगेन्स्ट करप्शन'चे यतीश देवादिगा यांनी chn.ge/Kkcv69 ऑनलाइन सह्यांची याचिका नेटिझन्ससमोर ठेवली आहे. आतापर्यंत या याचिकेवर सुमारे एक हजारांहून अधिक जणांनी ऑनलाइन स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यावर प्रतिक्रिया दिल्यानंतर थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार व महापौर मोहिनी लांडे यांच्या "ई-मेल'वर "नोटिफिकेशन' जाणार आहे. विशेष म्हणजे देश-विदेशातून सोशल मीडियावर लाइक होत असून, आयुक्तांच्या विरोधात एकही प्रतिक्रिया औषधालाही सापडत नाही; तर निगडी-प्राधिकरण सिटिझन्स फोरमचे अमोल देशपांडे यांनी facebook.com/SupportDrShrikarPardeshi ही फेसबुकवर लिंक निर्माण केली आहे. त्यावर बाराशेहून अधिक नागरिकांनी लाइक केले आहे.