उद्योजकांची पुण्यालाच पसंती: चाकण। दि. १५ (वार्ताहर)
‘‘देशात मंदीचे सावट असतानाही उद्योग क्षेत्रात होणारी गुंतवणूक महत्त्वाची आहे. चाकण परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा विचार होत असल्याने या क्षेत्राला येथे पूरक वातावरण आहे. सर्व राज्यांत उद्योग सुरू करण्यासाठी मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. पण बहुराष्ट्रीय कंपन्या व उद्योजक
चेन्नई, बंगळुरू, अहमदाबादपेक्षा पुण्याला पसंती देतात. यामुळे महाराष्ट्र हे औद्योगिक राष्ट्र म्हणून ओळखले जाते,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.
चाकण एमआयडीसी फेज दोनमधील वासुली येथे जीई इंडियाज मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज या कंपनीचे भूमिपूजन व पायाभरणी समारंभ प्रसंगी मुख्यमंत्री चव्हाण बोलत होते.
‘जीई’चे अध्यक्ष जॉन फ्लँडी म्हणाले, ‘‘चाकणला उद्योग सुरू करण्यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध असल्याने व राज्य शासनाने चांगले सहकार्य केल्याने आम्ही येथे १000 कोटींची गुंतवणूक करून जवळपास दोन हजार लोकांना रोजगार देणार आहोत.’’ कंपनीचे उपाध्यक्ष जॉन राईस व प्लँटचे प्रमुख श्रीकांत श्रीनिवासन यांनी मनोगत व्यक्त केले.
मुख्यमंत्री चव्हाण, उद्योगमंत्री नारायण राणे, राज्याचे मुख्य सचिव अजितकुमार जैन, आमदार दिलीप मोहिते, आमदार विलास लांडे यांनी दीपप्रज्वलन करून कंपनीचे भूमिपूजनही केले. राणे म्हणाले, ‘‘उद्योग महाराष्ट्राबाहेर चालले आहेत, असा टाहो पिटला जात असताना जगातील चौथ्या क्रमांकाची ‘जीई’ १000 कोटींची गुंतवणूक राज्यात करत आहे. चीन, अमेरिका व कोरियामधून राज्यात कारखाने येऊ पाहत आहेत. हे उद्योजक सर्वात जास्त चाकणला पसंती देत आहेत.’’
टॉम मिश्चर यांनी आभार मानले. शेवटी सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
अर्थव्यवस्थेचा विकास करण्यासाठी कृषी व उद्योग क्षेत्राचा विकास झाला पाहिजे. उद्योगक्षेत्राला चालना देण्याचे राज्याचे धोरण आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा वाटा १८ टक्के असून, हा वाटा २५ टक्क्यांवर गेला पाहिजे. शासन उद्योगांना सहकार्य करत असल्यानेच जीई कंपनी १000 कोटींची गुंतवणूक येथे करीत आहे.
No comments:
Post a Comment