पिंपरीत जकात विभागापुढे येत्या साडेतीन महिन्यांत ४७० कोटींचे उद्दिष्ट:
िपपरी महापालिकेच्या जकात विभागाला चालू आर्थिक वर्षांत १३०० कोटी उत्पन्नाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले. औद्योगिक मंदीसह अन्य कारणांमुळे हे आव्हान पालिकेला पेलता येणार नसल्याचे चित्र पुढे आले आहे. उर्वरित साडेतीन महिन्यांच्या कालावधीत ४७० कोटी रुपये उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट जकात विभागासमोर आहे. दुसरीकडे, एक एप्रिल २०१३ पासून जकात रद्द करून स्थानिक संस्था कर लागू करण्याची पूर्ण तयारी पालिकेने सुरू केली आहे. अशातच, जकातचोरांनी पुन्हा आपले उद्योग सुरू केल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेची श्रीमंती जकात विभागावर अवलंबून आहे. जकातातून मिळणाऱ्या भरीव उत्पन्नामुळे भव्य व खर्चिक प्रकल्प शहरात होऊ शकले आहेत. त्याचप्रमाणे, अनेक सुधारणाही झाल्या. पालिकेला २००९-२०१० मध्ये ७०९ कोटी, २०१०-११ मध्ये ९१३ कोटी, २०११-२०१२ मध्ये १२२८ कोटी रुपये उत्पन्न मिळाले.
चालू आर्थिक वर्षांत २०१२-२०१३ मध्ये १३०० कोटींचे लक्ष्य महापालिका सभेने दिले आहे. त्यानुसार, नेहमीच्या पद्धतीने नियोजनबद्ध वाटचाल सुरू ठेवत जकातीने १२ डिसेंबर २०१२ अखेर ८३० कोटी रुपये मिळवले. मागील वर्षी याच तारखेपर्यंत ८२२ कोटींचे उत्पन्न मिळवण्यात यश आले होते. चालू वर्षांत आगामी साडेतीन महिन्यांत ४७० कोटींचा पल्ला गाठण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे. तथापि, प्रतिकूल परिस्थितीमुळे ते अवघड असल्याचे दिसते.
अलीकडच्या काळात शहरात असलेले मंदीचे वातावरण व मोठय़ा कंपन्यांचे 'ब्लॉक क्लोजर' यासारख्या कारणांमुळे जकातीच्या उत्पन्नाला मोठा फटका बसतो आहे. दुसरीकडे, जकात बंद होणार व स्थानिक संस्था कर लागू होणार असल्याने, या परिस्थितीचा अधिकाधिक लाभ घेण्याच्या हेतूने जकातचोर सरसावले आहेत.
No comments:
Post a Comment