पुणेरी माणसाचा सोनेरी सदरा!: पिंपरी। दि. २७ (प्रतिनिधी)
दत्तजयंतीच्या मुहूर्तावर नेहमी सोनसाखळ्या, ब्रेसलेट्स आणि अंगठय़ा खरेदी करायचो. यंदा वाटले सोन्याचाच शर्ट शिवावा. १७ दिवस शर्ट शिवला जात होता. त्याचे शिवणकाम म्हणजे कलाकुसरच अधिक. त्याचे ‘गुंजभर’ तयार होणेही मन मोहरून टाकत होते. दरदिवशी तो वेगळाच दिसत होता, परवा तो पूर्ण तयार झाला. एकटक त्याच्याकडे पाहिले आणि अंगात घातला तेव्हा नेहमीचा ‘सदरा’ घातल्याचाच फिल होता. अगदी मुलायम. पण, एक स्वप्न पूर्ण झाल्याचे समाधान तो सोनेरी स्पर्श देत होता..
पुण्याच्या भोसरीतील व्यावसायिक दत्ता फुगे त्यांच्या अंगातील सोन्याच्या शर्टाबद्दल सांगत होते. गळ्यावरील सोनसाखळ्या, हातात ब्रेसलेट्स आणि अंगठय़ा हे सारे सारे होते. महिनाभरापूर्वी रांका ज्वेलर्समध्ये ते पत्नीसह गेले. यंदा नवे काय, असे रांका यांना विचारताच त्यांच्याकडील शिरीष नावाच्या कारागिराने शर्ट शिवला तर. असे म्हटले आणि त्यांनी लगेच होकार दिला. दोन किलोचा होणारा शर्ट आता सव्वातीन किलोचा झाला.
हा शर्ट पाहून आता पत्नीही नवे काहीतरी घेऊ, असा हट्ट करीत आहे. तिच्याकडे दीड किलो सोन्याचे दागिने आहेत. आता दोघांकडे साडेअकरा किलो सोने झाले आहे. वयाच्या १५व्या वर्षापासून फुगे सोन्याचे दागिने वापरत आहेत. बेताची परिस्थिती असतानाही वडिलांकडे हट्ट करून त्यांनी सोन्याची एक अंगठी आणि चेन करून घेतली होती. पुढे परिस्थिती चांगली झाल्यावर ही सवय जडली जी ४२व्या वर्षीही कायम आहे. पुढे सोन्यामध्ये मोबाइल घडवायचा आहे. सध्या तरी या सुवर्ण शर्टखाली पांढरी किंवा काळी पॅण्ट घालू. शिवाय पार्टी व महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्येच म्हणजे महिन्यातील वीसेक दिवस हा शर्ट घालू, इतरदिवशी कडेकोट बंदोबस्तात तो ठेवू. यासाठी सुरक्षारक्षकही नेमले आहेत, असे फुगे सांगतात. शर्टाची बांधणी नेहमीच्याच पध्दतीची आहे. त्याची घडी होते. तो स्वच्छ करता येतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
असा आहे शर्ट...
- साडेतीन किलो सोने, स्वारोसकी क्रिस्टलची बटन्स व पांढर्या रंगाच्या वेलवेट कापडाचा वापर केला आहे.
- सोन्याच्या १४ हजार टिकल्या व १ लाख छोट्या कड्यांच्या (रिंग) साहाय्याने तो बनविला असल्याने कापडाप्रमाणे घडी करता येतो. शर्टसाठी ३ हजार २00 ग्रॅम व त्याच्या बेल्टसाठी ३२५ ग्रॅम २२ कॅरेटचे सोने वापरण्यात आले.
- देशातील हा पहिलाच सोन्याचा शर्ट असल्याचा दावा करीत त्याची गिनीज बुक व लिम्का बुकमध्ये नोंदीसाठी प्रयत्न करणार आहे.
No comments:
Post a Comment