पिंपरी भाजप शहर उपाध्यक्ष मडिगेरींवर हल्ला: पिंपरी। दि. २0 (प्रतिनिधी)
भाजपचे शहर उपाध्यक्ष तसेच माहिती अधिकार (आरटीआय) कार्यकर्ते विलास मडिगेरी यांच्यावर रविवारी रॉड व दांडक्याने हल्ला करण्यात आला. त्यांचे डोके, पाठ तसेच भुवईला गंभीर दुखापत झाली आहे. वायसीएम रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना थेरगावातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
कीर्तन कार्यक्रमाची तयारी सुरू असताना स्पीकरच्या आवाजावरून उद्भवलेल्या वादातून दुपारी साडेचारच्या सुमारास भोसरीतील इंद्रायणीनगरमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी सचिन चौधरी या संशयिताला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचे इतर साथीदार मडिगेरी यांना जिवे मारण्याची धमकी देऊन पसार झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश टेकवडे, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ढेरंगे यांच्यावरील हल्लय़ाच्या घटना ताज्या असताना मडिगेरी यांना मारहाण झाल्याची ही गेल्या १५ दिवसांतील तिसरी घटना आहे.
पोलीस आणि पदाधिकार्यांत वाद
हल्लय़ाबाबत समजताच युतीचे कार्यकर्ते रुग्णालयात पोहोचले. पो. निरीक्षक चंद्रकांत भोसले हेदेखील तेथे आले. मडिगेरींचा जबाब नोंदविण्यासाठी पोलिसांकडून घाई होऊ लागल्याने पदाधिकार्यांचा त्यांच्याशी वाद झाला. त्यांच्यावर प्राथमिक उपचार होऊ द्या. नंतर जबाब नोंदवा असे शहराध्यक्ष पवार, शिवसेनेचे चांदगुडे त्यांना सांगत होते. मडेगिरी यांच्या प्रकृतीचा विचार न करताच पोलीस मनमानी पद्धतीने वर्तन करीत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. राष्ट्रवादीच्या दबावामुळे पोलीस आमच्या कार्यकर्त्यांशी तुसडेपणाने वागत असल्याचा आरोप युतीच्या पदाधिकार्यांनी केला.
No comments:
Post a Comment