Sunday, 17 February 2013

पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे

पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे: पुणे। दि. १६ (प्रतिनिधी)

भारती विद्यापीठ, वारजे माळवाडी व हिंजवडी या तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध धंदे आढळून आल्याने संबंधित ठाण्यांच्या तिघा वरिष्ठ निरीक्षकांना पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी लेखी सक्त ताकीद दिली आहे. आयुक्तांनी कडक धोरण स्वीकारल्याने अधिकारी व कर्मचार्‍यांची झोप उडाली आहे.

शहरामध्ये कुठेही मसाज पार्लर, दारू अड्डे, हुक्का पार्लर, मटका अड्डे चालू देऊ नयेत. अशा धंद्यास कुणी अधिकारी अथवा कर्मचारी प्रोत्साहन देत असल्याचे आढळून आल्यास त्याच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोळ यांनी चार दिवसांपूर्वी दिला होता. दरम्यान, गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यामध्ये तीन ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध धंदे आढळून आल्याने आयुक्तांनी कारवाईचा बडगा उचलला आहे.

गुन्हे शाखेच्या पथकांनी १२ फेब्रुवारी रोजी भारती विद्यापीठ व १३ फेब्रुवारी रोजी हिंजवडी आणि वारजे पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये अवैध दारू धंद्यांच्या अड्यांवर छापे टाकून त्यांच्यावर कारवाई केली होती. तसेच हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याच्या तक्रारी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे गेल्या होत्या. पाटील यांनी स्वत: आयुक्तांना फोन करून ते हुक्का पार्लर तातडीने बंद करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्‍वभूमीवर हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश देवरे, वारजे ठाण्याचे सुनील दरेकर, भारती विद्यापीठचे एस. आर. तांबारे यांना लेखी स्वरूपात सक्त ताकीद आयुक्तांनी दिली आहे.

अवैध धंद्यांवर अतिरिक्त पोलीस आयुक्त, उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांनी लक्ष घालण्याच्या सूचना पोळ यांनी दिलेल्या आहेत. अवैध धंद्यांना प्रोत्साहन देताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी. जर ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांचाच यामध्ये सहभाग असल्याचे आढळले तर त्यांचा अहवाल माझ्याकडे पाठवा, असे आदेश पोळ यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकार्‍यांचे आयुक्तांना निवेदन
दिल्ली येथे घडलेल्या सामूहिक बलात्कार घटनेच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील हॉटेल, बार, पब्ज रात्री वेळेत बंद व्हावेत याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे, असे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्यावतीने आयुक्त गुलाबराव पोळ यांना आवाहन करण्यात आले आहे. हॉटेल्स वेळेतच बंद झाली पाहिजेत, याकडे बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना पोळ यांनी पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांना दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment