Thursday, 7 February 2013

नव्या धोरणामुळे उद्योगांना चालना

नव्या धोरणामुळे उद्योगांना चालना: चाकण। दि. ५ (वार्ताहर)

‘‘शासनाने उद्योगांसाठी नवीन औद्योगिक धोरण लागू केले असून, त्यात काही धोरणात्मक बदल केले आहेत. त्यामुळे उद्योगांना अधिक चालना मिळेल. येत्या ५ ते ६ महिन्यांत देशाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल,’’ असा विश्‍वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केला.

चाकण एमआयडीसी क्र. २ मधील ब्रिजस्टोन इंडिया प्रा. लि. कंपनीच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, ‘‘२00८ पूर्वी आर्थिक विकासदर ८ टक्के होता. तो ४ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. युरोपियन बाजारपेठेतील घसरण व अन्य घटकांचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही होत आहे. परंतु, मोठी लोकसंख्या व बाजारपेठेमुळे आपली अर्थव्यवस्था टिकून आहे. ’’

‘‘राज्यात उद्योगांना पाणी व विजेची कमतरता नसल्याने उद्योजक समाधानी आहेत. मात्र, दुष्काळाचा विचार करता प्रत्येकाने पाणी वाचवायला हवे. उद्योजकांनी परिसरात मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण करावे. उद्योगांमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून, कंपनीने प्रशिक्षणासाठी संशोधन व विकास केंद्र उभारावे,’’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कंपनीच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हिरोमी तानिगावा, मुख्य कार्यकारी अधिकारी काझुहिसा निशिगाई, जपानचे कौन्सिल जनरल कियोशी असाको, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, कंपनीचे संचालक अजय शेवेकरी यांची भाषणे झाली.

याप्रसंगी आमदार दिलीप मोहिते, उद्योग विभागाचे सचिव अजित खान, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, जिल्हाधिकारी विकास देशमुख, ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज लोहिया, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर, तालुकाध्यक्ष विजय डोळस, माजी अध्यक्ष भास्कर तुळवे, महिलाध्यक्षा नंदाताई कड, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल पवार, पं. स. सदस्य अँड. सोमनाथ दौंडकर, सरपंच सतीश शेटे, उपसरपंच रविंद्र गाढवे, चाकण चेंबर ऑफ कॉर्मस अँड इंडस्ट्रीजचे पदाधिकारी उद्योगपती आनंदराव महाळुंगकर, अंकुश बेंडुरे, दिलीप बटवाल, माजी जि. प. सदस्य शरद बुट्टे-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. ‘ब्रिजस्टोन’कडून मुख्यमंत्री मदतनिधीसाठी दहा लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. अजय शेवेकरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

‘‘चाकण परिसरात विमानतळ उभारणीला केंद्राने आणि राज्यानेही ‘हिरवा कंदिल’ दाखवला असून, या विमानतळाच्या कामास लवकरच प्रारंभ होईल. तसेच, हे विमानतळ लवकरच सुरू होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. ‘‘चाकण परिसरात मोठय़ा प्रमाणावर ऑटो कंपन्या आल्या असून, त्यामुळे या परिसरातील रोजगारातही वाढ झाली आहे. त्यामुळे हा परिसर देशाचे ऑटो हब म्हणून आता ओळखला जात आहे. मोशीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे औद्योगिक प्रदर्शन केंद्रही सुरू करण्यात येणार आहे. चाकणमधील विमानतळ सुरू झाल्यावर येथील कंपन्या व या प्रदर्शन केंद्रास त्याचा नक्कीच लाभ होईल. तसेच, या परिसराच्या विकासासही मोठा हातभार लागेल,’’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.

No comments:

Post a Comment