शिक्षणाधिकारी हटावसाठी सदस्य झाले सज्ज: पिंपरी । दि. १५ (प्रतिनिधी)
शिक्षण मंडळाला ऑगस्ट २0१२ पासून पूर्णवेळ शिक्षणाधिकार्याची प्रतीक्षा होती. शासनाने प्रतिनियुक्तीवर अशोक भोसले यांची निवड करून जानेवारी २0१३ मध्ये ती संपुष्टात आणली खरी; पण रुळलेल्या प्रथेला त्यांची कार्यपद्धती जुळणारी नसल्याने सदस्य नाराज झाले आहेत. सोमवारी होणार्या बैठकीत भोसले यांना पुन्हा शासन सेवेत पाठवावे, अशा मागणीचा ठराव करण्यास पदाधिकारी, सदस्य सज्ज झाले आहेत.
विशिष्ट सदस्यांच्या मर्जीनुसार आणि ठेकेदारांच्या संगनमताने कारभार होत असल्याचे मंडळावर अनेकदा आरोप झाले आहेत. शैक्षणिक साहित्य खरेदी प्रकरणाचा फटका तत्कालीन शिक्षणाधिकारी बाळासाहेब ओव्हाळ, विष्णू जाधव यांना बसला. ओव्हाळ यांची तडकाफडकी बदली झाली. त्यानंतर पुणे जिल्हापरिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डी. के.दहिफळे यांच्याकडे या पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली होती. ते पूर्ण वेळ देऊ शकत नव्हते. त्यामुळे पूर्णवेळ शिक्षणाधिकारी म्हणून भोसले आले. मंडळाच्या पूर्वेतिहासावरून काम करणे कठीण असल्याचे लक्षात येताच भोसले यांनी महिना पूर्ण होण्याआधीच, स्वत:च बदलीची मागणी केली. परिस्थिती सुधारेल या आशेवर दिवस ढकलणे सुरू आहे. आयुक्त श्रीकर परदेशी यांचा शिस्तीचा कारभार त्यात काही चुकीचे घडू नये, याची दक्षता घेत काम करणे कसरतीचे ठरू लागले आहे. सदस्यांच्या दृष्टीने त्यांची कामाची कसरत कुचकामी ठरणारी आहे. त्यामुळे भोसले यांना परत शासनसेवेत पाठवा, अशी मागणी सदस्यांकडून जोर धरू लागली आहे.
No comments:
Post a Comment