प्लॅस्टिक पिशव्या वापरणार्या व्यापार्यांवर कारवाई: काळेवाडी । दि. १ (वार्ताहर)
परिसरातील अनेक दुकानदार, व्यावसायिक व हातगाडीवाल्यांकडून ५0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर केला जात आहे. यासंदर्भात आज महापालिकेच्या आरोग्य विभागातील ‘ड’ प्रभाग अधिकार्यांच्या एका पथकाने कारवाई करून काही व्यावसायिकांना दंड केला. तसेच त्यांच्याकडील पिशव्यांचे बंडल जप्त केले.
गेल्या काही वर्षांपासून ५0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी आहे. या भागातील अनेक व्यावसायिक अशा पिशव्या वापरत असल्यामुळे पाचपीर चौकातील एका स्वीट मार्ट दुकानावर कारवाई करून ५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडील व हातगाडीवाल्यांकडील ५ किलो पिशव्या जप्त करून त्यांना अशा पिशव्या न वापरण्याबाबत सक्त ताकीद देण्यात आली. या कार्यवाहीमध्ये सहायक आरोग्य अधिकारी शंकर लगज, व्ही. एस. चव्हाण, मुख्य आरोग्य निरीक्षक गणेश देशपांडे, काळेवाडी विभागाचे आरोग्य निरीक्षक वसंत सरोदे, मारुडा, आरोग्य मुकादम साहेबराव मोरे, रमेश भालेराव, आरोग्य कर्मचारी आत्माराम ठाकर, रमेश जगताप व इतर कर्मचारी सहभागी झाले. या मोहिमेतून इतर व्यावसायिकांनीही आपली मानसिकता बदलून अशा पिशव्यांचा वापर न करता कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहनही या वेळी करण्यात आले. अनेक व्यापार्यांनी प्लॅस्टिक पिशव्या दुकानांतून गायब करत कारवाईपासून वाचण्याचा प्रयत्न केला.
प्लॅस्टिकच्या पिशव्या खाऊन अनेक जनावरे दगावतात. जनावरांच्या पोटातून २, ४ किलो प्लॅस्टिकचा लगदा शस्त्रक्रिया करून बाहेर काढल्याची अनेक उदाहरणे आहेत. पावसाळ्यात गटारे तुंबुन राहिल्यामुळे पर्यावरण प्रदूषण वाढते. म्हणून प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर नागरिकांनी टाळावा.
- शंकर लगज,
सहायक आरोग्य अधिकारी
No comments:
Post a Comment