फ्लेक्स निर्मूलन मोहीम!: पिंपरी । दि. १४ (प्रतिनिधी)
शहरातील बेकायदा होर्डिंग आणि फ्लेक्स हटविण्याच्या कारवाईत महापालिकेच्या अ प्रभागाने आघाडी घेतली असून निगडी, प्राधिकरण, चिखली भागातील १२0 बेकायदा फ्लेक्स अ प्रभाग कार्यालयाच्या पथकाने हटविले. अन्य प्रभागांच्या तुलनेत ही कारवाई मोठी होती. महापालिका कर्मचार्यांनी गॅस कटरचा वापर करून होर्डिंग काढून टाकले.
अ प्रभागाने केलेल्या कारवाईत ४0 मोठे होर्डिंग काढण्यात आले. मध्यम व छोट्या आकारातील ८0 फलक हटविण्यात आले. सराफी पेढीचा अनधिकृत फलक हटविताना महापालिका कर्मचार्यांची व्यापार्यांशी शाब्दिक चकमक उडाली. गॅस कटर घेऊन तयारीत गेलेल्या कर्मचार्यांनी सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई केली. कस्तुरी मार्केट, साने चौक आदी भागातील जाहिरात फलक गॅस कटरच्या साह्याने काढून टाकले. अन्य प्रभागात हटविण्यात आलेल्या जाहिरात फलकांची संख्या कमी असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. ब, क आणि ड प्रभागातील हटविलेल्या फ्लेक्सची आकडेवारी सायंकाळी उशिरापर्यंत उपलब्ध झाली नाही.
शहर बकाल करणार्या होर्डिंग कमी झाल्याचे चित्र सायंकाळी पहावयास मिळाले. दिवसभरात कोणावरही फौजदारी स्वरूपाची कारवाई मात्र झाली नाही. अनेक पदपथांवर फ्लेक्सची गर्दी होती. एलबीटीविरोधात व्यापार्यांनी बंद पाळला असल्याने बंद दुकानाच्या आवारातील बेकायदा फलक काढणे कर्मचार्यांना सोपे गेले. वादावादीच्या घटना घडल्या नाहीत. पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी आदी भागात दिवसभर कारवाई करण्यात आली. उच्च न्यायालयाने महापालिका हद्दीतील होर्डिंग तातडीने हटविण्याचे आदेश दिले असल्याने चारही प्रभागातील कर्मचारी दिवसभर या कारवाईत व्यस्त होते.
No comments:
Post a Comment