Wednesday, 10 April 2013

पवार, राज ठाकरे यांच्या असभ्य वक्तव्याचा निषेध

पवार, राज ठाकरे यांच्या असभ्य वक्तव्याचा निषेध: पिंपरी। दि. ८ (प्रतिनिधी)

इंदापूर येथील जाहीर सभेत रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या असभ्य वक्तव्याचा आणि त्यावर त्याच भाषेत प्रतिक्रिया देणार्‍या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नागरी हक्क सुरक्षा समितीने निषेध केला आहे. महाराष्ट्रात दुष्काळाने होरपळणार्‍या जनतेची क्रूर चेष्टा करणारे वक्तव्य उपमुख्यमंत्री पवार यांनी इंदापूर येथील जाहीर सभेमध्ये केले. त्यांच्या अर्वाच्य वक्तव्यामुळे या राज्यात नागरिकांची मान शरमेने खाली गेली आहे. भोळ्या भाबड्या जनतेने केलेल्या मतदानामुळेच ‘असले’ राज्यकर्ते आपण माथी मारून घेतले आहेत.

उपमुख्यमंत्र्यांनी केवळ माफी मागून चालणार नाही. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामाच दिला पाहिजे. ते देत नसतील तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीने केली आहे. अशाच प्रकारचे वक्तव्य दिवंगत मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी १९८२ मध्ये केले होते. त्या वेळी स्व. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा ताबडतोब राजीनामा घेतला होता. शरद पवार हे धाडस करणार का? असा सवालही समितीने विचारला आहे.

No comments:

Post a Comment