संगणक अभियंत्याची हिंजवडीत आत्महत्या: रहाटणी : हिंजवडीतील साखरे वस्तीत एका संगणक अभियंत्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
मेहुल दिनकर गावित (२२, रा. साखरे वस्ती, हिंजवडी) असे त्याचे नाव आहे. तो मूळचा अहमदनगरचा रहिवासी आहे. हिंजवडीतील कॉग्निझंट कंपनीत तो नोकरीस होता. गेल्या काही महिन्यांपासून भाडेतत्वावर खोली घेऊन तो मित्नांसमवेत राहात होता. सोमवारी दुपारपासून तो मोबाईलवरील कॉल स्वीकारत नसल्याने चारच्या सुमारास त्याची मैत्नीण त्याच्या खोलीवर आली. खोलीचे दार आतून बंद होते. वारंवार दरवाजा ठोठावूनही आतून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे ती खिडकीतून आत डोकावली. मेहुल याने गळफास घेतल्याचे दिसले. इमारतीच्या सुरक्षारक्षकाला तिने याबाबत माहिती दिली. पोलीसदेखील घटनास्थळी पोहोचले. पोलीसमित्र स्वामी पिंजण यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. गावित दुपारीच गावाहून परतला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तो प्रत्येक शनिवार, रविवारी गावी जात असे, अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली आहे. (वार्ताहर)
No comments:
Post a Comment