Tuesday, 28 January 2014

बँडबाजा वाजताच जमा झाली मिळकतकर थकबाकी

पिंपरी: थकबाकीदारांच्या घराजवळ बँडबाजा वाजविण्याचा महापालिकेने गांधीगिरी मार्ग अवलंबताच, मोरवाडीतील एका उद्योजकाने लगेच मिळकतकराच्या थकबाकीचे साडेचार लाख रुपये करसंकलन विभागाच्या कर्मचार्‍यांकडे जमा केले. 
दंड आणि जप्तीची कारवाई टाळायची असेल, तर थकबाकी जमा करावी, अशा स्वरूपाची रिक्षाला लावलेल्या ध्वनिक्षेपकावरून इशारावजा दवंडी पिटणार्‍या महापालिकेच्या करसंकलन विभागाची नेहमीची पद्धती नागरिकांना परिचित होती. या वेळी मात्र थकबाकीदारांच्या घरासमोर बँडपथक हजर झाले. बँडबाजा वाजू लागताच, आजुबाजूचे लोक जमा होऊ लागले आहेत. कुतूहलाने त्या ठिकाणी जमलेल्यांना लग्नाच्या वरातीचा अथवा अन्य कोणत्या कार्यक्रमाचा बँडबाजा नसून, थकबाकीवसुलीचा बँडबाजा असल्याचे लक्षात येते. मिळकतकराची थकबाकी असल्याचा गाजावाजा होऊ लागताच खजिल व्हावे लागणारे मिळकतधारक थकबाकी रक्कम भरण्यास पुढे येऊ लागले आहेत.

No comments:

Post a Comment