पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणतर्फे प्राधिकरणातील 129 अनधिकृत धार्मिकस्थळांना जाहीर नोटीसा बजावल्या असून एक महिन्याच्या कालावधीत त्या-त्या धार्मिकस्थळाच्या प्रशासनाने त्यांच्या काही हरकती असतील तर संबंधित क्षेत्रीय कार्यालयात नोंदवाव्यात. त्या हरकतींचा विचार करून शासननिर्देशाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, नवनगर विकास प्रधिकरणचे अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश आहिरराव यांनी दिली. याविषयी माहिती देताना आहिरराव म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय व शासनाच्या निर्देशाप्रमाणे याविषयी वर्तमानपत्रातूनही जाहीर प्रकटन दिले होते व तीच नोटीस जी धार्मिकस्थळे प्राधिकरणाच्या आरक्षित जागेत बांधली आहेत, अशा 129 मंदिरावर लावली आहे. यानुसार धार्मिकस्थळांच्या काही हरकती असतील तर त्यांनी 23 एप्रिल ते 24 मे या 30 दिवसाच्या कालावधीत त्या-त्या क्षेत्रीय कार्यालयात द्याव्यात. त्या हरकतींचा अहवाल बनवून तो प्राधिकरण समिती समोर मांडला जाईल. तसाच तो पुढे शासनासमोरही सादर केला जाईल व शासन निर्देशाप्रमाणे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment