पिंपरी, (प्रतिनिधी) –सदनिकेचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. गुरुवारी (दि. 20) दुपारी बारा ते सायंकाळी सातच्या दरम्यान सेक्टर नंबर 27 मध्ये हा प्रकार घडला.
संजय कानमल जैन (वय-42, रा. सेक्टर नंबर 27, निगडी प्राधिकरण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैन यांचे दत्तवाडी येथे लहान मुलांची खेळणी विक्री करण्याचा व्यवसाय आहे. गुरुवारी संजय नेहमीप्रमाणे दुकानात गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.त्यानंतर शयनगृहातील कपाटाचे लॉक उटकटून आतील सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली. सायंकाळी जैन घरी आले असता, त्यांना हा प्रकार समजला. त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. चार लाख बारा हजार रुपयांचा ऐवज असल्याची तक्रार जैन यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. जैन राहत असलल्या इमारतीमध्ये सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांनी इतर दृष्टिने तपास सुरू केला आहे. सहायक निरीक्षक देवेंद्र चव्हाण तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment