Friday, 17 August 2018

रोहन कुंभार यांना ‘आयर्न मॅन’ पदक

पिंपरी - जगातील सर्वांत खडतर आणि आव्हानात्मक म्हणून ओळखली जाणारी जर्मनी येथील २२८ किलोमीटर अंतराची ‘आयर्न मॅन’ शर्यत निगडी प्राधिकरण येथील धावपटू रोहन कुंभार यांनी १३ तास ५ मिनिटांत पूर्ण केली. या स्पर्धेत प्रथमच सहभागी होताना कुंभार हे ‘आयर्न मॅन’ पदकाचे मानकरी ठरले. मलेशिया येथील २०२० मधील नियोजित ‘आयर्न मॅन’ शर्यतदेखील पूर्ण करण्याचे लक्ष्य कुंभार यांनी ठेवले आहे.    

देशप्रेमाचा जागर

पिंपरी – चौकाचौकात ध्वजारोहण…, देशभक्तीपर विविध सांस्कृतिक कार्यक्रम…, साहित्य वाटप, वृक्षारोपणासारखे सामाजिक उपक्रम… अशा माध्यमातून पिंपरी-चिंचवड कामगारनगरीने 72 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला. शहरभर देशभक्तीचे वारे वाहत होते. शहराला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय मिळाल्याने पिंपरी-चिंचवडकरांसाठी स्वातंत्र्य दिन खास ठरला. दिमाखदार सोहळ्यात निगडीतील भक्‍ती-शक्‍ती चौकात असलेला देशातील सर्वात मोठा तिरंगा फडकवण्यात आला. हजारो शहरवासियांनी आवर्जून याठिकाणी हजेरी लावली.

बजरंग दलाकडून पर्यावरण जागृती पुरस्कार

वाकड – वाकड व आसपासच्या परिसरात सामाजिक संघटना व वाकड पोलीस ठाण्यात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बजरंग दल दत्तनगर शाखेच्या वतीने एकता मित्र मंडळ चौकामध्ये झेंडावंदन करण्यात आले. दत्तनगर परिसरातील माजी सैनिकांना यावेळी खास निमंत्रित करण्यात आले होते. ध्वजवंदन वाकड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष पाटील व पोलीस उपनिरीक्षक हरीश माने यांच्या हस्ते करण्यात आले. बजरंग दल शाखा दत्तनगर यांच्याकडून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत यावर्षी पर्यावरण जागृती पुरस्कार-2018 थेरगाव सोशल फाऊंडेशनला देण्यात आला. पर्यावरण संवर्धन तसेच शहर विद्रुपीकरण रोखण्यासाठी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बजरंग दल शाखेकडून कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

पिंपरी चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभागातर्फे स्वतंत्रता दिवस उत्साहात

चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाच्या वतीने जयनारायण मंगल स्मृतिवन मोशी येथे ७२ वा स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

स्वातंत्रदिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीतर्फे विशेष मुलांना वह्यांचे वाटप

स्वातंत्र्यदिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीतर्फे निगडी प्राधिकरण येथील सुहृद मंडळ संचलित मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वह्या आणि खाऊचे वाटप करण्यात आले.

घोरावडेश्‍वरावर भाविकांची गर्दी

देहूरोड : शेलारवाडी येथील घोरावडेश्‍वर डोंगरावरील लेणीतील श्री घोरावडेश्‍वराच्या दर्शनासाठी आज भाविकांनी रांग लावली होती. दिवसभरात सुमारे तीन हजार भाविकांनी दर्शन घेतले. पावसामुळे डोंगेावर जाणार्‍या पायवाटा अतिशय निसरड्या झाल्या होत्या. पण भाविकांचा ओघ कायम होता. श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्यामुळे आज पहाटे घोरावडेश्‍वर मंदिरात पारंपारिक पध्दतीने महापूजा, अभिषेक घालण्यात आला.

Thursday, 16 August 2018