Friday, 26 October 2012

सभापतींची तारीख पे तारीख..

सभापतींची तारीख पे तारीख..: पिंपरी । दि. २४ (प्रतिनिधी)

मागासवर्गासाठी आरक्षित जागेवर निवडणूक लढण्याकरिता स्थायी समिती सभापती जगदीश शेट्टी व बंधू उल्हास शेट्टी यांनी बनावट जात प्रमाणपत्र दाखल केले असल्याच्या आक्षेपाचा मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल आहे. त्यांच्या काही प्रतिस्पध्र्यांनी पिंपरी आणि जिल्हा न्यायालयातही धाव घेतली आहे. वेळोवळी न्यायालयात तारखांना हजर राहावे लागत असल्याने स्थायी समिती सभांना सभापतींना हजर राहता येत नाही. तारीख पे तारीखमुळे सभा तहकूब होऊ लागल्या आहेत.

जात प्रमाणपत्राबाबतच्या याचिकेमुळे शेट्टी बंधू अडचणीत आले आहेत. त्यांच्या मागे पोलीस आणि न्यायालयाचा ससेमिरा लागला आहे. विद्यानगर येथील राम पात्रे यांनी याबाबत उच्च न्यायालयात, तर अजंठानगर प्रभागातील शेट्टी यांचे प्रतिस्पर्धी भीमा बोबडे यांनी पिंपरी न्यायालयात दावा दाखल केला आहे. मागील महिन्यात या दाव्याची सुनावणी झाली. त्यात शेट्टी बंधूंसह महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून अहवाल सादर करण्याचा आदेश न्यायालयाने पोलिसांना दिला होता. महापालिका अधिकार्‍यांनी याप्रकरणी त्यांचे म्हणणे सादर केल्याने त्यांच्यावरील कारवाईस तात्पुरती स्थगिती मिळाली. शेट्टी बंधूंना मात्र न्यायालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. ऑक्टोबर महिन्यातील स्थायी समितीच्या साप्ताहिक सभा वारंवार तहकूब करण्याची वेळ आली आहे.

ऑक्टोबरची पहिलीच सभा गांधी जयंतीच्या सुटीमुळे झालीच नाही. त्यानंतर दि. ९ आणि १६ च्या सभांना सभापतींनी दांडी मारली. या तहकूब सभा गुरुवारी दि. १८ ला घेण्याचे निश्‍चित झाले. परंतु तीही ऐनवेळी तहकूब करावी लागली. दि. २३ ची साप्ताहिक सभाही पुढे ढकलण्यात आली. सभापतींच्या अनुपस्थितीमुळे कामकाजावर परिणाम होत आहे.

शेट्टींच्या चकरा

शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी ऐन निवडणूक काळात विभागीय जात पडताळणी समितीकडे शेट्टी यांच्या जात प्रमाणपत्राबाबत तक्रार नोंदवली आहे. बनावट जातप्रमाणपत्र असल्याचा आक्षेप त्यांनी नोंदवला असून, त्याचा पाठपुरावा सुरू आहे. जातपडताळणी समितीकडेही शेट्टी बंधूंना चकरा माराव्या लागत आहेत. दि. २९ रोजी पुणे विभागीय जात पडताळणी समितीपुढे शेट्टी यांची सुनावणी होणार आहे.

No comments:

Post a Comment