Thursday, 22 November 2012

बालहक्कासाठी झटणार्‍यांना धमक्यांचे इनाम

बालहक्कासाठी झटणार्‍यांना धमक्यांचे इनाम: प्रवीण बिडवे । दि. १९ (पिंपरी)

बालहक्कासाठी झटणार्‍या स्वयंसेवी संस्था व पदाधिकार्‍यांना समाजकल्याण विभाग आणि पोलिसांनी वार्‍यावर सोडले आहे. बालहक्काची चळवळ सुरू ठेवणे जोखमीचे ठरू लागल्याने बालकांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणार्‍या संस्था मावळतीला जाताना दिसत आहेत. बालकामगारांच्या पिळवणुकीची माहिती देणार्‍यांना ‘धमक्यांचे इनाम’ मिळू लागल्याने या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एक पाऊल मागे येणेच पसंत केले आहे. परिणामी शहरात बालहक्क चळवळ संथ झाल्याचे खेदजनक वास्तव बालकहक्क दिनाच्या पूर्वसंध्येला पुढे आले आहे.

‘समान शिक्षण समान प्यार, हर बच्चे का है अधिकार’ हा मंत्र अंगीकारून बालहक्क अभियान पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यरत आहे. बाल्यावस्थेतील मुला-मुलींना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी या अभियानाच्या माध्यमातून अनेकदा प्रयत्न करण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षकांकडून होणारी अमानूष मारहाण, हॉटेल-वीटभट्टय़ांपासून ते मोठय़ा कारखान्यांतही बालकामगारांचे होणारे शोषण या विरोधात आवाज उठविण्याचे काम बालहक्क अभियान गेली अनेक वर्षे करीत आहे.

२00९ मध्ये शहरातील दोन कुपोषित बालके उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल झाल्यानंतर या अभियानाने कुपोषण रोखण्याकडे लक्ष केंद्रित केले. शहरातील १५ ठिकाणी बाल पंचायत गट स्थापन करण्यात आले. थेरगाव, काळा खडक, म्हातोबानगर, सुभेदार रामजी आंबेडकरनगर, भीमनगर, विठ्ठलनगर, वेताळनगर, आनंदनगर, गांधीनगर, अण्णासाहेब मगर झोपडपट्टी, तापकीरनगर झोपडपट्टी, संजय गांधीनगर, वाकड येथील संघर्षनगर, बौद्धनगर, नाणेकर चाळ येथून गट काम करू लागले. जन्माला येणारे अर्भक कुपोषित नसावे यासाठी मातेला गर्भावस्थेपासूनच सकस आहार पुरविण्यात पुढाकार घेतला. अपहरण झालेल्या बालकांची सुखरूप सोडवणूक करण्यातही अभियानाने महत्त्वाची भूमिका बजावली.

ऊसतोडणी मजुरांची मुले, बांधकाम प्रकल्प, कारखाने, हॉटेल व्यवसायासह अन्य व्यवसायांतील बालकामगारांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या मुख्य उद्देशाने अभियान कार्यरत होते.

अभियानाचे जिल्हा निमंत्रक श्रीधर काळे म्हणाले, ‘‘सुटका केलेल्या बालकामगारांना सुधारगृहात पाठविण्याऐवजी त्यांना निवासी शाळेत पाठवावे असे धोरण शासनाने २00९ मध्ये जाहीर केले. परंतु बहुतांश ठिकाणी निवासी शाळा कागदावरच राहिल्या. बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे यासाठी अभियानातर्फे देशभर आंदोलन झाले. पुण्यात शिक्षण मंडळाच्या संचालक मंडळावर मोर्चा काढण्यात आला. तेव्हा आंदोलकांना गुन्हेगाराप्रमाणे पोलिसांनी मारहाण केल्याने कार्यकर्ते धास्तावले. पिळवणुकीची माहिती देणार्‍यांना कारखानदार व व्यावसायिकांकडून धमक्या येऊ लागल्या. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत चळवळीचे कार्य मंदावले.

फिर्यादी व्यावसायिकांच्या रोषाचे धनी

- बालकामगारांच्या पिळवणुकीसंदर्भात अभियानाचे पदाधिकारी कामगार आयुक्तालयास कळवितात. त्यानंतर कामगार आयुक्तालयाचा प्रतिनिधी, पोलीस आणि अभियानाचा प्रतिनिधी असे तिघांचे पथक छापे टाकून बालकामगारांची सोडवणूक करते. अशा पद्धतीने अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. परंतु अशा प्रकरणांत अभियानाच्या पदाधिकार्‍यांना फिर्यादी करण्यात आले. त्यांची नावे उघड झाली. परिणामी हे पदाधिकारी ज्यांच्यावर कारवाई झाली, त्यांच्या रोषाचे धनी ठरू लागले.

No comments:

Post a Comment