लोकशाहीदिनाचा खेळखंडोबा करणा-या अधिका-यांची आयुक्तांकडून खरडपट्टी
पिंपरी, 3 नोव्हेंबर
महापालिकेकडून दरमहा आयोजित केल्या जाणा-या लोकशाही दिनाचा खेळखंडोबा करणा-या अधिका-यांची महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी आज चांगलीच खरडपट्टी काढली. वर्ष होऊनही 20 तक्रारींचा निपटारा करण्यात अपयशी ठरलेल्या अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे आदेशही त्यांनी दिले.
नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. महापालिका आयुक्तांसह विविध विभागांचे अधिकारी लोकशाही दिनाला हजर असतात. नागरिकांना थेट अधिका-यांपुढे आपल्या तक्रारी मांडता येतात. तसेच बहुसंख्य तक्रारींची तत्काळ सोडवणूक करण्यासाठी लोकशाहीदिन राबविला जातो.
लोकशाहीदिनाला हेलपाटे मारुनही तक्रारींची सोडवणूक होत नसल्याचा अनुभव घ्यावा लागत असल्याहोते. नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा व्हावा यासाठी लोकशाहीदिन आयोजित केला जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासून प्रशासनाकडून नावापुरता ने नागरिकांचा लोकशाहीदिनातील सहभाग घटत चालला आहे.
आजच्या लोकशाही दिनालाही अवघे दोन तक्रार अर्ज प्राप्त झाले. आयुक्तांनी मागील दिनाच्या तक्रारींचा आढावा घेतला असता 20 तक्रारींची वर्ष होवूनही सोडवणूक झाली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे संतप्त झालेल्या आयुक्त डॉ. परदेशी यांनी या तक्रारींचा निपटारा करण्यास शेवटची संधी देण्याची सूचना करत तक्रारी न सोडविल्यास संबंधित अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे आदेश दिले.
आयुक्तांनी अधिका-यांना लोकशाही दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. ते म्हणाले की, लोकशाही दिनाला नागरिक तक्रार दाखल करत असतात. त्यामुळे या दिनाला अनन्य साधारण महत्त्व आहे. प्राप्त झालेल्या तक्रारींचे वेळेत निराकरण झाल्यास त्याच त्याच तक्रारी पुन्हा लोकशाही दिनात दाखल होणार नाहीत. त्यामुळे लोकशाही दिनाचे महत्त्व समजावून घेऊन तक्रारकर्त्यांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण झालेच पाहिजे, असे आयुक्तांनी बजाविले.
यावेळी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडील जिल्हा प्रकल्प अधिकारी वि. रा. वालगुडे, महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त प्रकाश कदम, शहर अभियंता महावीर कांबळे, सहशहर अभियंता अंबादास चव्हाण, राजन पाटील, विकास अभियंता अशोक सुरगुडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद जगदाळे, अतिरीक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहायक आयुक्त डॉ. उदय टेकाळे, आशादेवी दुरगुडे, सतीश कुलकर्णी, शहाजी पवार, प्रभाग अधिकारी पांडुरंग झुरे, दिलीप बंब, ए. वाय. कारचे, ज्ञानेश्वर ढेरे, शिक्षणाधिकारी एस. एस. कांबळे, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके, संगणक अधिकारी नीळकंठ पोमण, विशेष अधिकारी सुभाष माछरे आदी उपस्थित होते.
mypimprichinchwad.com
No comments:
Post a Comment