मद्यपी बस चालकाने प्रवाशांना धरले वेठीस !
पिंपरी, 3 डिसेंबर
पीएमपीएमएल बस कोणत्याही बसस्टॉपला न थांबवता एका मद्यपी चालकाने वाहकासहित बसमधील प्रवाशांना वेठीस धरले. या बसला वाहने आडवी घालत बसचालकाला पोलिसांनी अटक केली. हा प्रकार दुपारी साडेतीन वाजता बोपोडी चौकात घडला.
दत्तात्रेय मनोहर परब (वय 41, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परब हा दारु पिऊन येरवडा मार्गे जाणा-या पुणे स्टेशन ते निगडी ही बस घेऊन (एमएच12 ईक्यू 5570) निघाला होता.
दारुच्या नशेत तो कोणत्याच बस स्टॉपवर बस न थांबवता तशीच बेदरकारपणे चालवीत निघाला. हा प्रकार पाहून प्रवासी गोंधळले. त्यांनी आरडा ओरडा सुरू केला. वाहकाने त्याला बस थांबविण्यास सांगितले तरी त्याने जुमानले नाही.
त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. वाहकाने त्वरित पीएमपीएमएल च्या वरिष्ठ अधिका-यांना आणि पोलीस नियंत्रण कक्षाला फोन लावला. पोलिसांनी ही बस अडविण्याचा प्रयत्न केला. अखेरीस दुपारी साडेतीन वाजता पोलिसांनी या बसच्या पुढे गाडी आडवी घालून बसला थांबविले आणि
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली.
दत्तात्रय परब हा पूर्वी पीएमपीएमएलमध्ये चालक म्हणून कायमस्वरुपी नोकरीला होता. दारु पीत असल्यामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर पीएमपीएमएलच्या ठेकेदाराकडे त्याला चालकाची नोकरी देण्यात आली होती अशी माहिती पुढे आली आहे.
mypimprichinchwad.com
No comments:
Post a Comment