Monday, 10 December 2012

विमानतळाविरोधात शेतकरी एकवटला!

विमानतळाविरोधात शेतकरी एकवटला!: - आंदोलनाची दिशा लवकरच
- पक्षबिक्ष काही नाही, शेतकरीच आमचा पक्ष; लढत राहू!
पाईट। दि. ९ (वार्ताहर)

यापुढे पक्षबिक्ष काही नाही, शेतकरीच आमचा पक्ष..लढत राहू असा एकमुखी निर्णय घेत होऊ घातलेल्या विमानतळाविरोधात पाच गावांतील शेतकरी एकवटला.

धामणे (ता. खेड) येथे शेतकर्‍यांची बैठक झाली. त्यामध्ये माजी न्यायमुर्ती बी.जी.कोळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विमानतळ विरोधाचा लढा लढण्याचा त्यांनी निर्धार केला असून आंदोलनाची दिशा लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगितले. कोये, धामणे, रौंधळवाडी, पाईट परिसरातील १६00 हेक्टर क्षेत्र विमानतळासाठी निश्‍चित केल्यानंतर लगोलग झालेल्या हवाई पहाणीमुळे येथील शेतकरी धास्तावला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी तातडीने बैठक घेतली.

यावेळी शेतकर्‍यांनी तीव्र संताप व्यक्त करत निषेध व्यक्त केला. जमीनी वाचविण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी त्यांनी केली आहे. परिसरातील शेतकरी असंघटीत, नेतृत्वहीन व गाफील असल्याच्या मस्तीत शासन असले तरी त्यांना आंम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार त्यांनी केला. पुढील लढय़ासाठी ५0 हजारांवर लोकवर्गणी शेतकर्‍यांनी देवून आर्थिक बळही कमी पडू दिले जाणार नसल्याचे दाखवून दिले.

पाईटचे माजी सरपंच बळवंत डांगले, धामणचे माजी सरपंच अंकुश कोळेकर, कोयेचे उपसरपंच बबन राळे, बाळासाहेब मोरे, कुरकुंडीचे सरपंच कैलास कोळेकर यांनी संतप्त भघवना व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक अंकुश कोळेकर यांनी केले तर आभार पप्पू राळे यांनी मानले. विमानतळ विरोधी कृती समिती तयार केली आहे.

भामा आसखेड धरणाचे काम सुरू करताना अगोदर पुनर्वसन मग धरण म्हणत धरणाचे काम पूर्ण केले तरी पुनर्वसन झाले नाही. लाभ क्षेत्रातील पुनर्वसनासाठीच्या जागा अगोदरच लाटल्या. ३000 एकर जमिनी धरणात गेल्या. मग विमानतळाच्या जागेसाठी हट्ट का? आंम्ही कोर्टात जाऊ पण विमानतळ होऊ देणार नाही.
- बळवंत बांगले , माजी सरपंच (पाईट)

शासन शेतकर्‍यांचा विरोध नाही. पुणे-मुंबईला राहणार्‍या गुंतवणुक दारांच्या जमिनी आहेत, असे चुकीचे दृष्य लोकांसमोर उभे करत आहे. त्याला बळी न पडता शेतकरी आंदोलनाच्या मार्गाने जमिनी कोणाच्या हे शासनाला दाखवून देईल.
- अंकुश कोळेकर , माजी सरपंच (धामणे)

विमानतळासाठी जाणार्‍या जमिनी या परिसरातील शेतकर्‍यांच्याच असून आता जागा देणार नाही
- बबन राळे, उपसरपंच (कोये)

शासनाच्या नाकर्तेपणामुळे भामा असखेड धरण उशाला असताना परिसरातील जमिनी मात्र कोरडवाहू राहील्या तसेच धरणकाठी, नदीकाठी, विमाणतळ करताना पर्यवरणाचे प्रचंड नुकसान होत असल्याने कायदेशिर मार्गानेच लढणार आहोत.
- बाळासाहेब मोरे

No comments:

Post a Comment