७ महिन्यांत १६ बालकांचा करुण अंत: प्रवीण बिडवे । दि. १५ (पिंपरी)
कधी घरातल्या पाण्याच्या पिंपात बुडून, कधी बाल्कनीतून पडून तर कधी बांधकामासाठी खोदलेल्या खड्डय़ातील पाण्यात गटांगळ्या खाऊन अनेक बालकांनी आपला जीव गमावला आहे. निरागस बालपण फुलण्याआधीच कोमेजत असल्याच्या घटना शहरात वाढत असून, अशा घटनांमुळे शहरवासी अनेकदा हळहळले आहेत. शहरात अशा दुर्दैवी घटनांमध्ये ७ महिन्यांत १६ बालकांचा करुण अंत झाला आहे.
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बालकांच्या दुर्दैवी मृत्यूच्या सलग तीन घटना घडल्या. २६ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत घडलेल्या तीन घटनांमुळे क्षणात होत्याचे नव्हते झाले. इमारतीच्या बाल्कनीतून पडल्याने बालकांचा मृत्यू झाल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. त्यातील एक घटना काळेवाडीत तर दुसरी चिंचवडमधील दळवीनगरात घडली. काळेवाडीतील घटनेत आदित्य देविदास कराळे (वय ४) तर चिंचवडमधील घटनेत निधी प्रताप कठारे (९ महिने) या बालिकेने आपला जीव गमावला. बांधकामांसाठी खोदलेल्या खड्ड्यांतील पाण्यात बुडाल्याने तीन बालकांचा मृत्यू झाला आहे. तर गटारावर झाकण नसल्याने त्यात पडून एका बालकाचा मृत्यू झाला. एम्पायर इस्टेट ते काळेवाडी पुलासाठी महापालिकेने मोठे खड्डे खोदले आहेत. त्यातील एका खड्ड्याने प्रदीप नाथा साळवे (रा. बौद्धनगर, पिंपरी) या बालकाचा जीव घेतला. इमारतीसाठी खोदलेल्या खड्डय़ातील पाण्यात बुडाल्याने लक्ष्मीप्रिया वासुदेव हती (७) या बालिकेचा करुण अंत झाला. पुनावळे येथे घराजवळील खड्ड्यात पडून डोरेश्वरी प्रदीप शाहू (वय ३) या बालिकेला जीव गमवावा लागला. मोरवाडीतील लालटोपीनगरमध्ये साहेब अब्बास शेख (दीड वर्ष) या बालकाचा गटारात पडून मृत्यू झाला.
घरातील मोठय़ा भांड्यांत साठविलेले पाणीही चिमुकल्या जीवांसाठी धोकादायक ठरू लागले आहेत. पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या बालकांची संख्या मोठी आहे. भरलेल्या बादलीत पडून निशा राजू परिहार (वय १) या बालिकेचा मृत्यू झाला. हिंजवडीतील भटवारानगरमध्ये जुलैत ही घटना घडली होती. पिंपरीगावात साई सचिन वाघेरे (वय दीड वर्ष), यमुनानगरात वीणाकुमारी नीतेशकुमार (१४ महिने) या बालिकेचा असाच दुर्दैवी मृत्यू झाला. विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याच्या दोन घटना हिंजवडी आणि सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या. बांधकाम साईटवर अंघोळ करतेवेळी शॉक लागून नागेंद्रमा साहेबाना कारेल या बालिकेने तर पिंपळे गुरव येथे साहील समीर वाकडे (१३ महिने) याचा जीव गेला. याखेरीज डांगे चौकातील स्फोटात जखमी झालेल्या पीयूष संतोष वाळुंज (वय ६) या बालकाची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. तर मोहननगरमध्ये साहील बाबू पिसाळ (वय ६) या विद्यार्थ्याने शाळेच्या परिसरातील विहिरीतच जीव गमावला. भोसरी औद्योगिक वसाहतीमध्ये पित्याकडून कंपनीचे गेट ओढले जात असताना त्यामध्ये अडकून निरुता भरत ओढ (वय ४) या बालिकेचा जीव गेला.
No comments:
Post a Comment