संशोधन केंद्रावरून पेच: पिंपरी । दि. ३0 (प्रतिनिधी)
पिंपरी-चिंचवड परिसरातील तळवडे येथे पुणे विद्यापीठाचे संशोधन प्रकल्पासाठी ५0 एकर जागा आरक्षित केलेली आहे. गेले अनेक वर्ष हे आरक्षण विकसित न केल्याने यातील काही जागा आंद्रा धरणातून येणार्या बंदिस्त जलवाहिनीसाठी द्यावे, अशी महापालिकेने मागणी केली आहे. दरम्यान याच वेळी विद्यापीठाने ही जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे महापालिका व विद्यापीठाच्या निर्णयाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
१९९७ मध्ये महापालिकेत शहरालगतची १८ गावे समाविष्ट झाल्यानंतर २00२ मध्ये केलेल्या सुधारित विकास आराखड्यात ५0 एकर जागा शैक्षणिक उद्देशासाठी पुणे विद्यापीठाच्या नावाने आरक्षित करण्यात आली. तळवडे एमआयडीसीतील सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कच्या सीमेवर असणार्या सर्व्हे क्रमांक ३६८ मध्ये ही जागा आहे. तेथे संशोधन केंद्र निर्माण करण्याचा विद्यापीठाचा प्रस्ताव होता.
देहू-आळंदी रस्त्यावरील तळवडे गावातून देहूगावकडे जाणार्या उजव्या बाजूला असणार्या १८ मीटर रस्त्याने इंद्रायणी नदीकडे गेल्यानंतर काही अंतरावरच ३0 फुटी रस्ता आहे. त्यालगत ही जागा आहे. एका बाजूने सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क आणि दुसर्या बाजूने इंद्रायणी नदीलगतच्या हरित पट्टा, तिसर्या बाजूने देहूगावची सीमा अशी ही जागा आहे. २00६ पासून ही जागा विद्यापीठाने विकसित केलेली नव्हती. ती ताब्यात घेण्यासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेनेही हिरवा कंदील दिला आहे.
विद्यापीठ व महापालिकेच्या निर्णयाकडे लक्ष
- पवना बंदिस्त जलवाहिनीस प्रचंड विरोध झाल्यानंतर आंध्रा धरणातून पाणी आणण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. धरणातून पाणी उचलून इंद्रायणी नदीवरील तळवडे येथे आणून तेथून शुद्धीकरण करून ते पाणी शहरात पुरविले जाण्याचा महापालिकेचा विचार आहे. पाणीपुरवठय़ाच्या प्रकल्पासाठी विद्यापीठ संशोधन केंद्रातील काही जागा घेण्याचा महापालिकेचा विचार आहे. महापालिकेने पुणे विद्यापीठाला तसे पत्र दिले आहे. हे पत्र मिळाल्यानंतर विद्यापीठ जागे झाले आहे. पुणे विद्यापीठाने ही जागा ताब्यात घेण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. त्यामुळे आता जागेचा नवा पेच निर्माण झाला आहे. महापालिकेच्या जलवाहिनी प्रकल्पास जागा मिळणार की नाही, या जागेबाबत येथील सत्ताधारी पक्षाचे नेते, प्रशासन कोणता निर्णय घेणार याकडे शहराचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment