Wednesday, 16 January 2013

राजमाची परिसरात भरटकलेल्या विद्यार्थ्यांना शोधण्यात यश

राजमाची परिसरात भरटकलेल्या विद्यार्थ्यांना शोधण्यात यश
लोणावळा, 14 जानेवारी
लोणावळ्याजवळील राजमाची किल्ला परिसरात भरकटलेल्या पुण्यातील सहा विद्यार्थ्यांना तसेच एका वाटसरूला लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र मंडळ, राजमाची ग्रामस्थ व पोलिसांनी आठ तासांच्या अथक परिश्रमानंतर शोधून त्यांची सुटका केली. हे सात जण सहाशे मीटर खोल दरीत रविवारी मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास सापडले.

स्वप्नील संजय कांबळे (वय- 20), विकास किसनराव आंदेगावकर (वय- 21), शिवशंकर जगदीश बिरादार (वय- 20), निलेश देवराम आढाव (वय- 21), नंदकुमार बहिरू तोडमोल (वय- 21), मयूर माणिक नवसुपे (वय- 20, सर्व रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी पुणे) हे सहा विद्याथी आणि शिवाजी सहदेव मोहिते (वय- 60, रा. एएमएफसी कॉलेज इंदीरानगर, पुणे) असा एक वाटसरु अशी या भरकटलेल्यांची नावे आहेत. पुण्यातील बिबवेवाडी येथील व्हीआयटी इंजिनिअरिंग कॉलेजचे हे विद्यार्थी आहेत.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व विद्यार्थी रविवारी सुटटी असल्याने लोणावळा परिसरात पर्यटनासाठी आले होते. सकाळी अकरा वाजता ते लोणावळ्यापासून 16 किलोमीटर अंतरावरील राजमाची किल्ल्याकडे पर्यटनासाठी निघाले होते. दरम्यान, काही अंतर चालत गेल्यावर आपण वाट चुकलो असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने ते पुन्हा ज्या वाटेने आले त्या वाटेने परत माघारी फिरले. परंतु ते अधिकच भरकटले. अखेर त्यांनी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान पोलीस नियंत्रण कक्षाला मोबाईलवरून राजमाची परिसरात चुकलो असल्याची माहिती कळविली. नियंत्रण कक्षाने या घटनेची माहिती लोणावळा शहर पोलिसांना दिली.

पोलीस उपनिरीक्षक संदीप भोसले आपल्या सहका-यांसह राजमाची किल्ला परिसराकडे गेले. तत्पूर्वी पोलिसांनी मदतीसाठी लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र मंडळाला प्राचारण केले. सायंकाळी सहा वाजता पोलीस व शिवदुर्गचे सदस्य, राजमाची येथील काही युवकांनी शोध मोहिमेला सुरूवात केली. मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास भरकटलेल्या विद्यार्थ्यांचा शोध लागला. हे सर्वजण सहाशे मीटर खोल दरीत अडकून बसले होते. शोध पथक पोहचल्याचे पाहून विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

पोलीस उपनिरीक्षक संदीप भोसले, संतोष शेळके, राजेंद्र कुरणे, संतोष दोरगे, अमोल रोकडे तर शिवदुर्गचे अध्यक्ष- अजय राऊत, सचिव- सुनील गायकवाड, आनंद गावडे, राजू कडू, अशोक मते, गणेश गिध, विशाल पाडाळे, नरेश बोरकर, बाळू वरे व रघुनाथ यांच्या पथकाला आठ तासांच्या अथक परिश्रमानंतर या विद्यार्थ्यांना शोधण्यात यश आले.

No comments:

Post a Comment