Tuesday, 8 January 2013

विनयभंगातील आरोपीला महिलांकडून मारहाण

विनयभंगातील आरोपीला महिलांकडून मारहाण: पिंपरी। दि. ७ (प्रतिनिधी)

महिला व मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांबद्दलचा संताप सोमवारी पिंपरीत उफाळून आला. घरात घुसून नातीच्या वयाच्या मुलीचा विनयभंग करणार्‍या वृद्ध आरोपीला संतप्त महिलांनी चोप दिला.

मोरवाडी येथील न्यायालयात सोमवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. आरोपीला न्यायालयात अक्षरश: पळवत नेण्याची तसेच मागच्या दाराने परत घेऊन जाण्याची वेळ पोलिसांवर आली. दरम्यान, या आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

घरात घुसून १५ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी मोरवाडीत घडला होता. या प्रकाराबाबत वाच्यता केल्यास जिवे मारीन अशी धमकी देवून तो पळून जाण्याच्या तयारीत असताना मुलीने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पीडित मुलीच्या वडिलांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार देताच पोलिसांनी आरोपी हरभजनसिंग सुरनसिंग भामरा (६२, रा. वाघिरे एम्पायर, मोरवाडी, पिंपरी) याला रविवारी अटक केली होती.

पोलीस सोमवारी दुपारी दोन च्या दरम्यान भामरा याला न्यायालयात आणणार असल्याची कुणकुण काही राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकार्‍यांना लागली होती. त्यामुळे शिवसेनेच्या सीमा सावळे, राष्ट्रवादीच्या सुरेखा लांडगे, भाजपच्या अपर्णा मणेरीकर, कॉँगेसच्या श्यामला सोनवणे, उत्तर भारतीय विकास परिषदेच्या बिंदू तिवारी, वैशाली मराठे, विमेन्स वेल्फेयर फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना मिश्रा तसेच अन्य पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या तसेच विविध पक्ष आणि संघटनांशी संबंधित महिलांनी न्यायालयाच्या आवारात गर्दी केली. भामरा याला चोप देण्यासाठी त्या काठय़ा घेऊन एकत्रित जमल्या. न्यायालय इमारतीच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर ठाण मांडून आरोपीवर कठोर कारवाई करा, पीडितीला न्याय द्या, अशा घोषणा दिल्या जात होत्या.

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक मोहन विधाते यांनी महिला कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यामुळे अतिरिक्त बंदोबस्त मागविण्यात आला. भामरा याचे वकीलपत्र वकिलांनी स्वीकारू नये, असे निवेदन पिंपरी चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. महेश नागरगोजे, उपाध्यक्ष दत्ता झुळूक यांना देण्यात आले. तब्बल पावणेचार तासांनी पोलिसांनी भामरा याला न्यायालयात आणले. तो मोटारीतून उतरताच त्याला धक्काबुक्की तसेच मारहाण करण्यात आली.

No comments:

Post a Comment