Wednesday, 13 March 2013

महिलेची छेड काढणार्‍या ज्योतिषास धुतले

महिलेची छेड काढणार्‍या ज्योतिषास धुतले: पिंपरी । दि. १२ (प्रतिनिधी)

भविष्य जाणून घेण्यासाठी गेलेल्या महिलांचा हात तासन् तास हातात धरून त्यांच्याशी असभ्य वर्तन करणार्‍या भोंदूबाबाचा निगडी परिसरातील महिलांनी भांडाफोड केला. त्याला आणि त्याच्या साथीदारांना या रणरागिणींनी अक्षरश: धुतले व पोलिसांच्या ताब्यात दिले. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास यमुनानगरमध्ये हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक केली आहे. श्यामलाल हरिवंश पांडे (४0), संतोष दीनबंधू पांडे (३३), राजकुमार मुनीलाल पांडे (४३) आणि महावीर परमात्मा पांडे (२८, चौघेही रा. यमुनानगर, मूळ गाव, भावी, जि. गोपालगंज, बिहार) अशी त्या चौघांची नावे आहेत.

एका विवाहित महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. यमुनानगरमध्ये एका बंगल्यात आरोपी भाडेकरू म्हणून राहतात. भविष्य जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे गर्दी वाढू लागली होती. त्याच्याकडून कौटुंबिक आणि आर्थिक समस्यांवर तोडगा सांगितला जात असल्याने दररोज नागरिकांची रिघ लागली होती. विशेष म्हणजे बंगल्याचा पुढील दरवाजा बंद ठेवून प्रत्येक समस्याग्रस्ताला मागील दरवाजाने आत प्रवेश दिला जात होता. समस्याग्रस्त महिला या बंगल्यात आली की, श्यामलाल तासन्तास तिचा हात हातात धरून संवाद साधायचा. काही महिलांनी भोंदूबाबाचे हे प्रताप नगरसेविका सुलभा उबाळे यांच्या कानावर घातले. त्यांनी एका महिलेला पाठवून याबाबत खातरजमा केली. त्यांनी महिलांनी एकत्रित जमून या बंगल्यावर धडक मारली. भोंदूबाबा व त्याच्या सहकार्‍यांना काळे फासत चोप दिला. त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक नंदकिशोर भोसले पाटील यांनी दिली.

No comments:

Post a Comment