Tuesday, 12 March 2013

रस्त्यावर मिळणार हवामानाचा अंदाज

रस्त्यावर मिळणार हवामानाचा अंदाज: राहुल कलाल । दि. ११ (पुणे)
उन्हाच्या झळा वाढू लागल्याने पारा किती वाढला..रस्त्यावरून जाताना धूर जाणवतोय.. प्रदूषणाची पातळी किती आहे.. याची उत्सुकता सर्वांनाच असते. ही माहिती आता पुणेकरांना रस्त्यावरून येता-जाता मिळणारी आहे. भारतीय उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्थेने (आयआयटीएम) विकसित केलेली ‘सफर’ ही नवी यंत्रणा शहरात बसविण्यात आली आहे. याअंतर्गत माहिती देण्यासाठी शहरात १२ ठिकाणी एलईडी टीव्ही आणि प्रदूषण, हवामान आदींची मोजणी करण्यासाठी १0 ठिकाणी मॉनिटरिंग सिस्टीमची यंत्रणा उभारली आहे.

दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेसाठी आयआयटीएम संस्थेने ‘सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी फोरकास्टिंग अँन्ड रिसर्च’ (सफर) यंत्रणा विकसीत केली होती. यामध्ये हवेतील एकूण १0 विविध प्रदूषणाचे घटक मोजले जातात. तसेच हवामानाची स्थितीचा पुढील २४ तासाचा अंदाज, उन्हातील अल्ट्रा व्हायलट किरणांची तीव्रतासुध्दा मोजली जाते. त्याचा मोठा उपयोग या स्पर्धांमध्ये झाल्याचे दिसून आले. त्यामुळे केंद्रीय भू विज्ञान मंत्रालयाने मेट्रो शहरांमध्ये ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दिल्लीनंतर पुणे शहराची निवड करण्यात आली होती.

‘सफर’ यंत्रणेचे प्रमुख डॉ. गुफरान बेग यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, शहरात १0 ठिकाणी मोजणी करणारी यंत्रणा उभारण्यात आली आहे. तेथे तापमान, पाऊस, वार्‍याचा वेग, आद्रता मोजणे, दहा वेगवेगळया स्तरातील प्रदूषण, हवामानाच अंदाज, अल्ट्रा व्हायलेट रेडिएशनची पातळी मोजली जाणार आहे. एप्रिल २0१३ पर्यंत ही सिस्टीम पूर्णपणे काम करेल.

एलईडी टीव्ही
आयआयटीएम, पाषाण
पुणे वेधशाळा, शिवाजीनगर
पिंपरी चौक, चिंचवड
पुणे विमानतळ
आळंदी, कात्रज
पुणे लष्कर भाग
पुणे महापालिका
स्वारगेट, अलका टॉकीज चौक, फुले मंडई

मॉनिटरिंग सिस्टिम
आयआयटीएम पाषाण
पुणे वेधशाळा शिवाजीनगर
भोसरी, निगडी
पुणे विमानतळ लोहगाव
आळंदी
भारती विद्यापीठ कात्रज
लोहिया उद्यान हडपसर
मांजरी
डिआयएटी गिरीनगर

No comments:

Post a Comment