विनापाणी धूळवड साजरी: पिंपरी । दि. २८ (प्रतिनिधी)
दुष्काळी परिस्थितीचे सामाजिक भान राखत नागरिकांनी यंदा पाण्याला फाटा देत केवळ रंगाचा वापर करत धूळवड साजरी केली. आबालवृद्धांनी रंगांत भिजत आनंद लुटला.
विविधरंगी पाण्यात एकमेकांना मनसोक्त भिजविण्याचा उत्सव म्हणजे धूळवड. होळी समीप येऊ लागताच दर वर्षी आबालवृध्दांना रंग खेळण्याचे वेध लागतात. यंदाही मित्रमंडळींना रंगविण्यासाठी बच्चे कंपनीने धुळवडीच्या पूर्वसंध्येलाच जोरदार तयारी केली. रंगांबरोबरच पिचकार्यांचीही खरेदी करण्यात आली. अडगळीत पडलेले कपडे अंगावर चढवून तसेच हाती पिचकार्या घेऊन सकाळीच ते आवारात उतरले. एकमेकांवर रंगांची मुक्तपणे उधळण करण्यात आली. बच्चेमंडळींचा उत्साह पाहून महिलावर्गालाही राहवले नाही. त्यांनीही हातात रंग घेतले. काहींनी रंगाने संपूर्ण चेहरा रंगवीत, तर काहींनी केवळ रंगाचा तिलक लावीत धुळवड साजरी केली. बच्चे मंडळींनी रंग खेळण्यासाठी पाण्याचाही वापर केला. दुपारी ऊन माथ्यावर येताच रंग खेळणार्यांचा उत्साह कमी झाला. दुपारचा वेळ चित्रपटगृहे, उद्यानांत घालविला. दुपारनंतर बहुतांश व्यापार्यांनी दुकाने बंद ठेवली होती. चारनंतर रंग खेळणार्यांच्या उत्साहाला पुन्हा उधाण आले. सायंकाळी सातनंतर मात्र उत्साह ओसरला. लाल, काळे, निळे चेहरे झालेले तरुण मोटरसायकलवर शहरभर रपेट मारीत होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही. रंग खेळण्यासाठी फुगे, तसेच पाणी पिशव्या वापरू नयेत, असे आवाहन करण्यात येत होते.
ढूँढ उत्सवातूनही सामाजिक बांधिलकी
सिरवी क्षत्रिय समाजबांधवांनी यंदाही कासारवाडीतील आईमाता मंदिरात ढँूढ उत्सव साजरा केला. यंदा कोरडेच रंग खेळून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. गतवर्षी जन्मलेल्या २0 बालकांचा ढँूढ हा धार्मिक विधी करण्यात आला. पारंपरिक वेशभूषेत पुरुषांनी गेर नृत्य, तर महिलांनी घुमर नृत्य सादर केले. र्मदानी खेळांचे प्रात्यक्षिक झाले. चंदाराम चौधरी, हिरालाल चौधरी, अचलाराम काग, जेठाराम गेहलोत, रुगाराम कागू आदींनी उत्सव यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment