खड्डय़ाने घेतला बालिकेचा जीव: वाकड । दि. १२ (वार्ताहर)
हॉटेलमधील टाकाऊ पदार्थ टाकण्यासाठी खोदलेल्या ८ फूट खोल खड्डय़ात पडून बालिकेचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी घडलेली ही घटना तब्बल दोन दिवसांनी उघडकीस आली. मुंबई-बंगळूरू महामार्गालगत ताथवडे हद्दीतील एका हॉटेलच्या आवारात ही घटना घडली. खड्डय़ात पडून बालिकेचा मृत्यू झाल्याची नोंद हिंजवडी पोलिसांनी केली आहे.
साक्षी मारु ती अलकुंटे (वय ९, रा. काळाखडक, वाकड) असे या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. ती भूमकरवस्ती येथे मामाकडे राहावयास असून तिसरीत शिकते. शाळेला सुटी लागल्याने चार दिवसांपूर्वी ती काळाखडक येथे आई ललिता यांच्याकडे आली होती. त्या हॉटेलमध्ये भांडी घासण्याचे काम करतात. साक्षी त्यांच्यासमवेत हॉटेलमध्ये गेली होती. आईचे काम आटोपेपर्यंत ती तेथेच बाजूला खेळायची. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास साक्षी गायब झाली. शोधाशोध करूनही ती सापडेना. ती खड्डय़ात पडली असावी, असा संशय हॉटेल मालक गणेश चौधरी यांना आला. त्यांनी कामगारांना खड्डय़ात शोधायला लावले. त्यांनी लाकडाने खड्डय़ातील सांडपाणी हलविले, त्या वेळी तिचे पाय आढळून आले. तिला बाहेर काढून रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तिचा मृत्यू झाला होता. हॉटेलात भांडणे झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यामुळे बुधवारी पोलीस हॉटेलमध्ये गेले होते, त्या वेळी ही घटना उघडकीस आली.
No comments:
Post a Comment