Thursday, 22 June 2017

सत्ता भाजपची, वरचढ राष्ट्रवादीच...

पिंपरी- चिंचवड शहरात तीन महिन्यांपूर्वी अनपेक्षितपणे सत्तांतर झाले. अशाही परिस्थितीत ‘दादाला सत्तेवरून खेचणारा अजून जन्माला यायचाय’ इतका दांडगा आत्मविश्‍वास आपल्या सत्तेबाबत अजित पवारांना होता. रात्रीतून दादांच्या पायाखालची सतरंजी गेली आणि इथल्याही राजकारणाने कूस बदलली. भाजपच्या बेडकीचा पाहता पाहता बैल झाला. सत्तेच्या मस्तीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची झूल जनतेनेच उतरवली. भाजप बहुमतात आला आणि स्वप्नातसुद्धा नसताना राष्ट्रवादी थेट विरोधात बसली. अवघ्या तीन वर्षांत एक खासदार, दोन आमदार, १२८ पैकी ७८ नगरसेवक, आजी- माजी नेत्यांची उधार उसनवारी करून भाजपने सर्कस करत फौजफाटा उभा केला. केंद्र- राज्य पाठीशी असल्याने हत्तीचे बळ आले. त्यामुळे राष्ट्रवादीचे शिल्लक सरदार, भालदार, चोपदार एकदमच गारद झाले. राष्ट्रवादीचे नामोनिशाण मिटल्याचे चित्र होते. दोनच दिवसांपूर्वी महापालिका अर्थसंकल्पाच्या निमित्ताने सभागृहात भाजपविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे असे द्वंद्व पाहायला मिळाले. चर्चा न करताच अर्थसंकल्प मंजूर केल्याने भाजपवर दादागिरीचा आरोप झाला. राष्ट्रवादीने उठाव केला, सभात्याग केला. राष्ट्रवादीच्या चार मुरब्बी नगरसेवकांनी भाजपला कसा सत्तेचा कैफ चढला ते मांडले. पालखीच्या निमित्ताने वारकऱ्यांना भेट द्यावयाच्या ताडपत्री खरेदीत मोठा गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाने भाजपची अवस्था अंगावर पालच पडल्यासारखी झाली. राष्ट्रवादीच्या कोठारात दारूगोळा आणि सैन्य कमी असले, तरी जशा तोफा धडधडू लागल्या, तशी भाजपची गाळण उडाली. कारण भाजपकडे सीमा सावळे वगळता ९० टक्के नगरसेवक नवखे आहेत. त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे मंगला कदम, योगेश बहल, दत्ता साने, राजू मिसाळ, नाना काटे, अजित गव्हाणे यांच्यासारखे एकाचढ एक असे १७ पट्टीचे खिलाडी आहेत. या राजकीय लढाईत जरी सत्ता आणि संख्याबळ भाजपचे असले, तरी राष्ट्रवादीच वरचढ दिसली. सामसूम झाली असे वाटत असतानाच पुढच्या पाच वर्षांत पालिकेचे राजकारण कसे चालणार, त्याची एक झलक मिळाली. भाजपची मंडळी गैरव्यवहाराच्या एका फुटकळ आरोपाने पार सैरभैर झाली. सत्तेच्या सिंहासनाला किती काटे आहेत ते त्यांना प्रथम उमगले. 

No comments:

Post a Comment