भंकस कारभारावर मराठीत फार जुनी एक म्हण आहे. ‘मोरीला बोळा अन् दरवाजा सताड उघडा’. आजवरचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे धोरण त्यातलेच आहे. यावर्षापासून सत्ताधारी भाजपने काही अंशी त्याला मुरड घातली, हे बरे केले. पूर्वी काय चालत होते त्याचे थोडे विस्ताराने दर्शन घडविले म्हणजे इथे किती लूट चालत होती ते करदात्यांना समजेल. दरवर्षी शहरात होणाऱ्या महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी सोहळे, विविध महोत्सव, क्रीडा स्पर्धा, येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत म्हणजे जनसंपर्क विभागासाठी एक पर्वणी असे. निव्वळ पुष्पगुच्छ आणि शाल, श्रीफळ यावर ही मंडळी २५ चे ३० लाख रुपये खर्च करत. त्यातले खरे किती खोटे किती ते अधिकारीच जाणो. त्याहीपुढे आणखी कहर म्हणजे भूमिपूजन, उद्घाटन कार्यक्रमांसाठीचे जे छोटे मंडप उभारतात त्या सर्व मांडवांचा वर्षाचा खर्च साडेचार ते पाच कोटींच्या घरात आहे. गेले पंचवीस-तीस वर्षे एक-दोन ठेकेदार आलटून पालटून हे काम करतात. पुढाऱ्यांचे खासगी कार्यक्रम, वाढदिवस, गणेशोत्सव, अगदी लग्नसुद्धा त्यातच उरकतात. तिसरा मुद्दा म्हणजे कार्यकर्त्यांसाठी दरवर्षी छापण्यात येणाऱ्या डायऱ्या. ८-१० हजार डायऱ्या (दैनंदिनी) छापून घेण्यासाठी १० लाख रुपये खर्च होतात. दामदुप्पट दराने हे काम ठराविक ठेकेदार करत. ही उधळपट्टी आहे, करदात्यांच्या पैशावर दरोडा आहे असे म्हणत भाजपने हे सर्व खर्च बंद करायचा निर्णय घेतला. म्हणून त्यांना धन्यवाद. काटकसरीचे हे धोरण चांगले आहे, पण खर्चच वाचवायचे तर त्याहीपेक्षा मोठी मोठी कामे आहेत. जिथे आजवर शेकडो कोटींना महापालिका झोपली, ते थांबवा. मोरीला बोळा लावण्यापेक्षा दोन्ही दरवाज्यांवाटे जो पैसा वाहून चालला आहे त्याचा बंदोबस्त करा.
No comments:
Post a Comment