चिखली मोरेवस्ती परिसरातील भाजीमंडईत काही विक्रेत्यांनी घुसखोरी करून अनधिकृत शेड उभारले असल्याची तक्रार येथील भाजी विक्रेत्यांनी केली आहे. मंडईत मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असून स्थानिक लोकप्रतिनिधींनी भाजी विक्रेत्यांच्या प्रश्नांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे चिखलीतील भाजीमंडईचा प्रश्न सुटण्याऐवजी चिघळत आहे. चिखली मोरेवस्तीमधील भाजी मंडईत 130 गाळे आहेत. मात्र गाळेवाटपात पक्षपात करण्यात आला असून, लोक प्रतिनिधींनी दिलेले आश्वासन अद्याप पाळलेले नाही. त्यामुळे भाजी विक्रेते नाराज आहेत. ही मंडई दोन भागात विभागली गेली असून जुन्या आणि नवीन भाजी विक्रेत्यांमध्ये एकमत नसल्याने भाजी मंडई वार्यावर असल्याची सद्यस्थिती आहे. मंडईच्या समस्या मांडण्यासाठी कुणीही अध्यक्ष नाही. अध्यक्ष कोण असे विचारल्यास ‘आम्ही सर्वच अध्यक्ष आहोत’ असे उद्दाम उत्तर ऐकायला मिळाले.
No comments:
Post a Comment