Tuesday, 30 October 2012

नऊ महिन्यांत ४0 गुन्हे; दीड कोटीची लूट

नऊ महिन्यांत ४0 गुन्हे; दीड कोटीची लूट: प्रवीण बिडवे । दि. २८ (पिंपरी)

महागाईने होरपळणारे नागरिक आपल्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी दिवसरात्र राबत असताना चोरटे त्यांच्या कष्टाच्या ऐवजावर डल्ला मारून मालामाल होऊ लागले आहेत. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीतील चोर्‍या, जबरी चोर्‍या आणि घरफोड्यांसारखे ८१२ गुन्ह्यांपैकी केवळ ४0 गुन्ह्यांमध्येच चोरट्यांनी १ कोटी ४३ लाख ७१ हजार ५११ रुपयांची माया जमविली आहे. विशेष म्हणजे चोर्‍या आणि घरफोड्यांच्या १९ टक्केच गुन्ह्यांची उकल झाली असून, ८१ टक्के गुन्ह्यांतील आरोपी मोकाटच आहेत.

निव्वळ रोकड आणि दागिने चोरून नेण्याचे किमान तीन गुन्हे शहरात दररोज घडतात. तर लाखांहून अधिक किमतीचा ऐवज चोरून नेल्याचा आठवड्यात एक गुन्हा शहरातील पोलीस ठाण्यात नोंद होतो. असा मोठा ऐवज चोरीस जाण्याचे ४0 गुन्हे चालू वर्षात शहरात घडले आहेत. कंपन्यांमधून माल चोरीस गेल्याच्या घटना निराळ्याच. सोने सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिले नसताना सोनसाखळ्या, मंगळसूत्र हिसकावून नेण्याच्या प्रकारांनी नागरिक धास्तावले आहेत. असे ९३ गुन्हे घडले असून, त्यामध्ये वृद्ध महिला सावज ठरण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा जबरी चोरीच्या घटनांमध्ये ४0 लाखांहून अधिक किमतीचा ऐवज मोटरसायकलवरून येणार्‍या भामट्यांनी हिसकावून नेला आहे. आठवड्यात सोनसाखळी चोरीच्या किमान दोन घटना घडतात. असे सर्वाधिक १८ गुन्हे निगडी परिसरात घडले आहेत. त्याखालोखाल पिंपरी आणि चिंचवड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अशा १६ गुन्ह्यांची नोंद आहे.

चोरीचे सर्वाधिक १३३ गुन्हे हिंजवडीत, तर १३0 गुन्हे पिंपरीत दाखल आहेत. त्यांपैकी अनुक्रमे २१ आणि २४ गुन्हेच पोलीस उघड करू शकले आहेत. सांगवीत ११७, निगडीत ११0, भोसरीत १0५, चिंचवडमध्ये ८४, तर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा २३ गुन्ह्यांची नोंद आहे. घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लांबविण्याचे गुन्हे रात्री अधिक घडतात. शहरात १५६ ठिकाणी रात्री, तर ५३ ठिकाणी दिवसा घरफोड्या करून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. याखेरीज वाटसरूला रस्त्यात अडवून किंवा एखाद्या घरात घुसून त्याच्यावर पिस्तूल रोखत मोबाईल, रोकडसह ऐवज लुबाडून नेण्याचे ६७ गुन्हे घडले आहेत.

प्रवासादरम्यान गेला सात लाखांचा ऐवज
शहरात पीएमपी अथवा खासगी प्रवासी वाहनांनी प्रवास करताना जवळील रोख रक्कम, तसेच ऐवज चोरीस गेल्याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. २५ मे रोजी खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणार्‍या संदीप गोरक्षनाथ रावळ यांच्या बॅगेतून १ लाख ६0 हजारांचा ऐवज चोरीस गेला; तर ७ जुलैला किरण शरद बोरकर या रिक्षाचालकास प्रवाशानेच भोसरीत लुटले. त्याच्या जवळील ८१ हजारांचा ऐवज चोरून नेला. बहिणीने विश्‍वासाने ठेवण्यासाठी दिलेले सव्वादोन लाखांचे दागिने परत करण्यासाठी चाललेल्या सुनंदा राजू पाटील यांच्याजवळील दागिने चोरट्याने लांबविले. १८ जुलैला चिखली ते दिघी दरम्यान हा प्रकार घडला. बसमध्ये चढताना संचिता भरत गोळे यांनी ९0 हजारांचा, पल्लवी पांडुरंग पाटील यांनी ९६ हजारांचा, तर पवनकुमार सिंग यांनी ५७ हजारांचा ऐवज गमावला.

सर्वांत मोठी चोरी २९ लाखांची
हिंजवडीतील फ्लॅगशिप इन्फ्रास्ट्रर या कंपनीच्या छताला भगदाड पाडून २३ जुलैला २९ लाखांची रोकड चोरण्यात आली. प्राधिकरणातील अनुप कपिल यांच्या बंगल्यातून चोरट्यांनी १0 लाखांची रोकड व साडेतीन लाखांचे दागिने असा साडेतेरा लाखांचा ऐवज चोरून नेला होता. १२ जूनला पिंपरीतील उज्जीवन फायनान्समधील कर्मचार्‍यांना बंदुकीचा धाक दाखवून चोरट्यांनी ८ लाख ७३ हजार ५११ रुपये चोरून नेले. तर एम्पायर इस्टेट या वसाहतीमध्ये तीनवेळा चोरीच्या घटना घडल्या आहेत. मिलिंद सारंगधर पोळ यांच्या घरातून ६ लाख ९५ हजार तर अनिष डांगे यांच्या घरातून ५ लाखांचा तर मणजितसिंग लाड यांच्या घरातून १ लाख ३0 हजारांचा ऐवज चोरीस गेला.

No comments:

Post a Comment