पाच इमारतींवर हातोडा: वाकड। दि. ८ (वार्ताहर)
पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाने दुसर्या टप्प्यातील ५ अनधिकृत बांधकामांवर आज कारवाई केली. त्यातील ४ व्यावसायिक बांधकामांवर प्राधिकरणाचा हातोडा पडला. मोठय़ा पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरळीत पार पडली. कारवाईस विरोध करण्याचे कोणाचे धाडस झाले नाही. मात्र, प्रचंड संख्येने वाकडकर रस्त्यावर जमा झाले होते. आपलेही घर पाडले जाते की काय, असा भाव प्रत्येकाच्या चेहर्यावर दिसत होता.
इतर वेळच्या तुलनेत या वेळी कारवाई निवांतपणे संथगतीने सुरू होती. ११ वाजता एका पोकलेनच्या सहायाने कारवाईला सुरुवात झाली. या वेळी प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता व्ही. के. पाटील यांच्यासह उपअभियंता वसंत नाईक, शाखा अभियंता टी. आर. वारी, विद्युत विभाग उपअभियंता राजू काटे यांच्यासह लेखनिक, सर्व्हेअर, प्राधिकरण पोलीस, बिगारी आदी ५0 कर्मचारी कारवाईसाठी तैनात होते.
११ ला सर्व्हे १७७ काळाखडक रोडलगतच्या भरत कस्पटे व धनाजी बारणे यांच्या १४ व्यावसायिक गाळ्यांसह कार्यालय भुईसपाट करण्यात आले. पाऊणच्या सुमारास आणखी एका पोकलेनला पाचारण करण्यात आले.
दुसरी कारवाई काळाखडक रस्त्यालगतच्या हॉटेल साबीरच्या पत्राशेडवर करून ताफा आदर्श कॉलनी, वाकडरोडकडे वळला. येथील दिलीप कलाटे यांची पहिल्या कारवाईत पाडलेली, पण त्यांनी पुन्हा बांधलेली सीमाभिंत पाडण्यात आली. ५ वी कारवाई सुदर्शन कॉलनी नं. २ मधील चंद्रकांत गायकवाड यांच्या ३ मजली २४00 स्क्वेअर फूट इमारतीवर करण्यात आली. ही कारवाई होईपर्यंत ५.३0 वाजले होते. त्यामुळे यानंतर कारवाई थांबविण्यात आली.
या वेळी बंदोबस्तासाठी सहायक पोलीस आयुक्त सुधीर चौगुले यांच्यासह ८ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, २४ उपनिरीक्षक, १३३ पोलीस कर्मचारी, ४४ महिला कर्मचारी, हिंजवडी वाहतूक विभागातील एका उपनिरीक्षकासह ४ पोलीस कर्मचारी, एक दंगल काबू पथक (सीआरपी) तसेच मुख्यालय राखीव फोर्स मागील वेळी झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तावर होते.
No comments:
Post a Comment