शहिदांची नावे रस्त्यांना देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी कधी?:
पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांना शहीद पोलीस अधिकाऱ्यांची नावे देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. मात्र, त्याची अंमलबजावणी केली नसल्याची बाब राजीव गांधी प्रतिष्ठानने आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. यापुढील काळात पालिकेतील महत्त्वाच्या प्रकल्पांना अथवा मोठय़ा रस्त्यांना त्यांची नावे देऊन त्यांच्या बलिदानाची आठवण कायम ठेवावी, अशी मागणी प्रतिष्ठानने केली आहे. राजीव गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदेशकुमार नवले यांनी आयुक्तांना हे निवेदन दिले आहे. मुंबईत २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, तुकाराम ओंबाळे, संदीप उन्नीकृष्णन यांची नावे पालिकेच्या प्रकल्पांना देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्याचे काय झाले, असा मुद्दा प्रतिष्ठानने उपस्थित केला आहे. त्याची अंमलबजावणीसाठी प्रतिष्ठानकडून सतत पाठपुरावा केला जात आहे. महापालिका सभागृहात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावावे, अशी मागणीही संस्थेने आयुक्तांकडे केली आहे.
No comments:
Post a Comment