एड्स प्रतिबंधक लस विकसित करण्यात ब-यापैकी यश
पिंपरी, 1 डिसेंबर
पिंपरी-चिंचवडमधील भोसरीच्या राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था अर्थात नारी मार्फत एड्स नियंत्रण व प्रतिबंधासाठी 1992 पासून जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. या संस्थेत एड्स प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी गेली सात वर्षं संशोधन सुरु आहे. नारीने विकसित केलेली पहिली एड्स प्रतिबंधक लस फारशी परिणामकारक नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, विकसित केलेल्या दुस-या लशीला मात्र प्रत्यक्ष चाचण्यांना समाधानकारक प्रतिसाद मिळत असल्याने शास्त्रज्ञांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. या प्रयत्नांनाना लवकरच यश मिळेल, अशी आशा आज जागतिक एड्स दिनाच्या पार्श्वभूमीवर नारीच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली.
जागतिक एड्स दिनानिमित्त एड्सवर नारी या संस्थेत होत असलेले प्रयोग, त्यांना मिळणारे यश व एड्स नियंत्रण व प्रतिबंध याबाबत प्रचार व प्रसारासाठी आज ओपन हाऊसचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एड्सवर प्रदर्शनही भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात एचआयव्ही आणि त्यावरील औषधांची माहितीही देण्यात आली होती. आज सुमारे दोन हजार नागरिकांनी नारीच्या प्रयोगशाळेला भेट देऊन तेथील तपासणी व उपचारांची माहितीही घेतली. यावेळी एड्स प्रश्नमंजुषेचे आयोजनही करण्यात आले होते.
एड्सचा प्रसार रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या भारतीय आर्युविज्ञान संशोधन परिषद आणि भारत सरकारच्या आरोग्य खात्याच्या अधिपत्याखाली एचआयव्ही एड्सवर संशोधन करणारी राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था ही पिंपरी-चिंचवडमध्ये 1992 मध्ये स्थापन करण्यात आली. एचआयव्हीची लागण रोखण्यास मदत होऊ शकणा-या पद्धती, एचआयव्हीबाधित रुग्णांनी घ्यावयाची काळजी त्याचप्रमाणे एचआयव्ही विषाणूंच्या जैविकतेबद्दल माहिती यावर या संस्थेमधील संशोधन केंद्रीत केले आहे. नारी ही संस्था राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाला तांत्रिक बाबतीत मदत करते. नारी या संस्थेत 2005 पासून एड्स प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी संशोधन सुरू आहे. त्याशिवाय अँटी रेट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) सेंटरद्वारे एड्सचा प्रसार रोखला जावा यासाठीही प्रयत्न केले जातात. 'शून्याकडे वाटचाल आणि जे आत्तापर्यंत कमावलेले आहे ते भक्क्म करण्यास कटीबद्ध आहोत' हे नारीचे घोषवाक्यच आहे.
एड्स प्रतिबंधक लस विकसित करताना आतापर्यंत दोन वेगवेगळ्या संशोधनांना काही प्रमाणात यश मिळाले आहे. सुरवातीला देण्यात आलेली लस ही अपेक्षेपेक्षा खूप कमी प्रमाणात काम करत होती. त्यामुळे नंतर आणखी प्रयोग करुन अडव्हॅक्स आणि एमव्हीए सारख्या लशी विकसित करण्यात आल्या. या प्रयत्नांना मात्र काही प्रमाणात यश मिळाले आहे. पुणे आणि चेन्नई येथे हे प्रयोग करण्यात आले. यात 32 जणांचे दोनगट करण्यात आला होता. 18 ते 49 या वयोगटातील स्त्री-पुरुषांवर हे प्रयोग करण्यात आले. या प्रत्यक्ष चाचण्यांना मिळालेला प्रतिसाद हा नारीच्या शास्त्रज्ञांचा उत्साह वाढविणारा आहे.
एआरटी सेंटरच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार केले जातात. या संशोधनात एड्सचा प्रसार होण्यास रोखणारी औषधे विकसीत करण्यात आल्याचा दावाही डॉ. मनीषा घाटे यांनी केला. डॉ. घाटे म्हणाल्या की, पती आणि पत्नी यापैकी एखाद्याला एचआयव्हीची बाधा झाली असली तर त्याचा जोडीदाराला संसर्ग होणार नाही, अशी औषधेही विकसीत करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.
अनेकदा औषधांना विषाणु दाद देत नाही. अशा विषाणुंना ड्रग रेझीस्टंट म्हणुन त्याची वेगळी तपासणी करुन त्यांना वेगळी औषधे दिली जातात. पहिल्या टप्प्यात एनएनआरटीए व एनआयटीए सारखी औषधे दिली जातात. मात्र या औषधांचा विषाणुंवर काहीही परिणाम होत नसेल तर या औषधांची मात्रा वाढवुन दिली जाते. याची तपासणी देशातील प्रमुख शहरातील संस्थांमध्ये केली जात असल्याचे शास्त्रज्ञ डॉ. संदीप त्रिपाठी यांनी सांगितलं.
जागतिक एड्स दिनानिमित्त नारी संस्थेत आयोजित केलेल्या प्रदर्शनाला सुमारे दोन हजार जणांनी भेट दिली. त्यात विद्यार्थी व विद्यार्थिनींचा संख्या लक्षणीय होती.
एचआयव्ही एड्स प्रतिबंधक लस आता दृष्टीपथात आली आहे. प्रत्यक्ष चाचण्यांमधून लशीच्या प्रभावाची खातरजमा झाल्यानंतर तसेच आवश्यक त्या कायदेशीर बाबींची पूर्तता करून ही लस बाजारात उपलब्ध होऊ शकणार आहे. एचआयव्हीच्या संकटानं धास्तावलेल्या समाजाला ही निश्चितच मोठा दिलासा देणारी बाब आहे.
No comments:
Post a Comment