खेळताना बादलीत बुडून एक वर्षाच्या चिमुकल्याचा अंत
पिंपरी, 17 डिसेंबर
आई झोपलेली असताना खेळत-खेळत पाण्याच्या बादलीत पडून बुडाल्याने एक वर्षाच्या चिमुरड्याचा आज दुपारी दुर्दैवी अंत झाला. पिंपरी-चिंचवडमधील रहाटणी भागात ही दुर्घटना घडली. पालकांच्या दुर्लक्षामुळे लहान मुलांना प्राण गमवावा लागण्याची महिनाभरातील पिंपरी-चिंचवडमधील ही चौथी घटना आहे.
समीर अर्जुनकुमार केवाट (वय एक वर्ष) असे या दुर्घटनेत मरण पावलेल्या चिमुरड्याचे नाव आहे. समीरचे वडील हे अनिलकुमार हे मूळचे छत्तीसगडचे बिगारीकामासाठी ते पिंपरी-चिंचवडमध्ये आले आहेत. शाहूनगर येथे ते राहात होते. आज सकाळी समीरची आई बाळाला घेऊन रहाटणी येथे नातेवाईकांकडे गेली होती.
त्या ठिकाणी आईची झोप लागल्यानंतर छोटा समीर एकटाच खेळत होता. तो खेळत असलेली वस्तू पाण्याने पूर्ण भरलेल्या एका बादलीत पडली. ती वस्तू काढण्यासाठी चिमुकला समीर वाकला आणि तो बादलीत पडला. त्याच्या नाका-तोंडात पाणी गेल्यानं तो गुदमरला गेला. घरातील लोकांच्या हा प्रकार लक्षात येईपर्यंत फार उशीर झाला होता. समीरला तातडीने महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या महिनाभरात पालकांच्या हलगर्जीपणामुळे चार बालकांचा दुर्दैवी अंत झाला आहे. भोसरी 'एमआयडीसी'तील शर्मा प्रेसिंग कंपनीमध्ये 25 नोव्हेंबरला सायंकाळी सातच्या सुमारास निरूता ओढ या चार वर्षांच्या मुलीचा कंपनीच्या प्रवेशद्वारात अडकून मृत्यू झाला.
चिंचवडच्या दळवीनगर येथील उज्वल सोसायटीत 27 नोव्हेंबरला निधी कटारे ही नऊ महिन्यांची मुलगी इमारतीच्या चौथ्या मजल्याच्या बाल्कनीतून पडून मृत्युमुखी पडली. तर 28 नोव्हेंबरला मोशी येथे पाण्यात पडून तुषार माळी या दोन वर्षांच्या लहानग्याचा मृत्यू झाला.
पालकांच्या हलगर्जीपणामुळे शहरात महिनाभरात चार मुलांचा मृत्यू झाला आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी पालकांनी आपल्या लहान मुलांवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
No comments:
Post a Comment