चिंचवड येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या हॉलमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील लघुउद्योजकांच्या समस्या जाणून घेणे व उद्योजकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी लघुउद्योजक व पोलीस यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी लघुउद्योजकांनी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्यासमोर 'एमआयडीसी'तील समस्यांचा पाढा वाचला. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेखला, पोलीस उपायुक्त शहाजी उमाप, सहायक पोलीस आयुक्त सुधीर चौगुले आदी उपस्थित होते.
यावेळी मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे सचिव दीपक करंदीकर, पिंपरी-चिचंवड प्लास्टिक असोसिएशनचे गोविंद पानसरे, लघुउद्योग संघटनेचे सचिव संदीप बेलसरे, लघुउद्योजक दीपक फल्ले, संजय आहेर, विकास ताकवणे, शिवाजी साठे, जगदीश राणे, आर. एस. नागेशकर, अमोल सोमाणी, सुभाष कारकर, साहेबराव खरात आदींनी उद्योजकांच्या समस्या मांडल्या.
एमआयडीसीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. लहान मुलांच्या मदतीने महिलांची टोळी सक्रिय झाली आहे. तलवारीचा धाक दाखवून दरोडेखोर कारखाने लुटत आहेत. चोरांकडून भंगार विकत घेणा-या व्यावसायिकांवर कारवाई करावी, त्यांना जरब बसविण्यासाठी चिखली, कुदळवाडी, तळवडे परिसरातील विनापरवाना स्क्रॉप डिलरवर कारवाईची मागणी लघुउद्योजकांनी केली आहे.
प्रत्येक महिन्याच्या सात ते 15 तारखेच्या दरम्यान कामगारांची होणारी लुटमार रोखा अन्यथा उद्योगधंदे बंद पाडण्याची वेळ येईल. चोरी, लुटमारीच्या वाढत्या घटनांमुळे उद्योगनगरीतील कामगार, मालक असुरक्षित झाले आहेत. या सर्व प्रकारावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या सुरक्षा अधिका-यानेही कंपनीच्या जागेतील झोपड्यांच्या अतिक्रमणाबाबत व्यथा व्यक्त केली.
पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीत उद्योजकांच्या समस्या गंभीर आहेत. उद्योगनगरीत सुमारे चार हजार लहान मोठे उद्योग आहेत. याठिकाणी माथाडी कामगारांची समस्या, भंगार वितरक, लुटमार, खंडणीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. त्याकडे पोलिसांनी गांभीर्याने पाहाण्याची गरज असल्याचे मत मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे सचिव दीपक करंदीकर यांनी व्यक्त केले.
लघुउद्योजकांनी कारखान्याच्या आवारात सीसीटीव्ही कॅमरे बसवावेत, त्यामुळे कारखान्यातील चोरीच्या घटना रोखल्या जातील. एमआयडीसीतील जागांवर झालेल्या अतिक्रमणासाठी पोलीसांकडून सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल. याशिवाय चोरीचा माल विकत घेणा-यांवर पोलीस कारवाई करतील. खंडणी मागणा-यांवर कारवाई केली जाईल, दादागिरी, भाईगिरी आणि भीतीचे वातावरण निर्माण करणा-यांना पोलीसी खाक्या दाखविला जाईल. पगाराच्या काळात 'एमआयडीसी'त कामगारांना होणा-या लुटमारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीसांकडून गस्त घातली जाईल, खंडणीची मागणी केली तर ताबडतोब पोलिसांना कळवा, असे आश्वासन देऊन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी या उद्योजकांची बोळवण केली.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
No comments:
Post a Comment