Saturday, 1 December 2012

सिंचन श्वेतपत्रिका वाचलीच नाही - अजित पवार

सिंचन श्वेतपत्रिका वाचलीच नाही - अजित पवार
पिंपरी, 30 नोव्हेंबर
श्वेतपत्रिका आपण वाचलीच नाही. त्यामुळे त्याबद्दल बोलणे चुकीचे ठरणार असल्याचे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंचन श्वेतपत्रिकेबाबत मौन बाळगले. सिंचन प्रकल्प, साहेब आणि आपल्यातील संबंध आणि आता बारामतीच्या विभाजनावरुन काही महाभाग आपल्याविरोधात गैरसमज पसरवित आहेत. मात्र कार्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करुन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आवाहन करतच जातीयभेद करु नका, बेरजेचे राजकारण करा, असे सांगत त्यांनी स्थानिक पदाधिका-यांना कानपिचक्याही दिल्या.

शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरामध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, महाराष्ट्र राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष आझम पानसरे, महापौर मोहिनी लांडे, उपमहापौर राजू मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, शहर समन्वयक नानासाहेब शितोळे, प्रदेश सरचिटणीस यशवंत भोसले, सत्तारुढ पक्षनेत्या मंगला कदम, स्थायी समितीचे सभापती जगदीश शेट्टी, माजी महापौर अपर्णा डोके, आर. एस. कुमार, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सुरेखा लांडगे, युवक शहराध्यक्ष मयुर कलाटे, शिक्षण मंडळाचे सभापती विजय लोखंडे, नगरसेवक उल्हास शेट्टी, जितेंद्र ननावरे, सुजाता पालांडे आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहर चहुबाजूने वाढत आहे. महापालिका, एमआयडीसी आणि प्राधिकरणाबरोबरच समाविष्ट गावांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. शहराचे प्रश्न शंभर टक्के सुटत नाहीत. काही सुटले तरी नव्याने प्रश्न निर्माण होतात. विकास कामे करताना संघटना मजबूत असायला हवी. महापालिका निवडणुकीच्या वेळी सर्व कार्यकर्ते एकत्र येवून काम करतात. त्यामुळे महापालिका निवडणुकीत त्याचे चांगले यश मिळते. मात्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत संघटनेऐवजी नगरसेवकांवर अवलंबून रहावे लागत असल्याने काम न करणा-या नगरसेवकांच्या प्रभागामध्ये फटका बसतो. त्यामुळे मिळून मिसळून काम करा, काम करा, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केल्या.

सिंचन श्वेतपत्रिकेबाबत बोलताना ते म्हणाले की, राज्य सरकारने सिंचन श्वेतपत्रिका काढली आहे. मात्र आपण ती वाचली नाही. त्यामुळे त्याच्याबाबत बोलणं चुकीचं ठरेल. मधल्या काळामध्ये सिंचन प्रकल्पांवरुन आपल्या विरोधात चुकीची माहिती पसरविली गेली. मात्र श्वेतपत्रिकेतून दुध का दुध आणि पाणी का पाणी होईल. बारामती जिल्ह्याच्या विभाजनाबाबतही चुकीची माहिती पसरविली जात आहे. माझ्या वक्तव्याच्या विपर्यास केला गेला. काहींनी तर शिरुर, पुरंदर देणार नाही, असे म्हणत विरोध करायलाही सुरुवात केली आहे. जिल्हा म्हणजे कोणा एकट्या-दुकट्याची मक्तेदारी आहे का, असा सवालही त्यांनी केला. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाबाबत प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार साहेब आणि आपल्यात बिनसल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र आमच्यात असे कोणतेही वाद नाहीत. शरद पवार हे आपले दैवत आहेत. राष्ट्रवादी हे आपले कुटुंब आहे. त्यामुळे कुटुंबाचा सदस्य या नात्यानेच आपण पक्षाचे मनापासून काम करत आहोत. काही महाभाग नाहक माझ्या विरोधात गैरसमज पसरवित आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले. राज्यात अर्धी सत्ता असली तरी चुकीच्या कामांना विरोध करा, असेही त्यांनी सांगितले. पक्षाचे काम करताना जातीयवाद करु नका, आपआपसातील मतभेद ताणू नका, बेरजेचं राजकारण करा, गटातटाचे राजकारण करु नका, असे सांगत त्यांनी स्थानिक पदाधिका-यांना कानपिचक्या दिल्या.

No comments:

Post a Comment