सहा वर्षांनंतर मुलाने घेतला वडिलांच्या हत्येचा सूड
पिंपरी, 30 नोव्हेंबर
भारतीय जनता पक्षाचे दिवंगत शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांची सहा वर्षांपूर्वी डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या झाली होती. या हत्येच्या सुडातून भोसरीत गुरूवारी (दि. 29) सराईत गोट्या ऊर्फ सचिन धावडेचा 15 जणांच्या टोळक्यांनी तलवार, कोयत्याने आमनुषपणे खात्मा केला. वडिलांवर झालेल्या निर्घृण खुनाचा सूड मुलाने घेतल्याने पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. भोसरीत गेल्या सहा वर्षांत 'गँगवॉर'च्या भडक्यातून सहा जणांचा काटा काढण्यात आला आहे. दुहेरी खुनप्रकरणी अंकुश लांडगे यांचा मुलगा राहुल लांडगे याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. तिघांना आज, शुक्रवारी (दि. 30) पिंपरी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिघांना 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
भोसरी येथील धावडेवस्तीत गुरूवारी दुपारी 'क्रॉस फायरिंग' व कोयता, तलवारीच्या अमानुष हल्यात सराईत गोट्या धावडे, अंकुश लाडके यांचा खात्मा झाला. तर संदीप मधुरे हा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी स्व. अंकुश लांडगे यांचा मुलगा राहुल (वय-20), किशोर मधुकर साखरे (वय-22), अभिषेक शिवाजी जरे (वय-22, सर्व रा. धावडेवस्ती, भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांना आज पिंपरी न्यायालयात हजर केले असता मुख्य न्यायदंडाधिकारी सुनील हाके यांनी तिघांना 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींकडून आय-20 मोटार व एक इटालीय बनावटीचे पिस्तुल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
'या' दुहेरी हत्याकांडातील अजूनही भोसरी पोलिसांसाठी तब्बल 11 आरोपी 'वॉन्टेड' आहेत. त्यामध्ये बाळा ऊर्फ प्रकाश बाबासाहेब लांडगे, रवी बाबासाहेब लांडगे, प्रवीण ऊर्फ चिम्या पोपट लांडगे, विकास पोपट लांडगे, किरण काटकर, अतुल काटकर, जगदाळे, जगदाळे याचा भाऊ (सर्व रा. धावडे वस्ती, भोसरी), योगेंद्र ऊर्फ चिन्या रावत (रा. इंद्रायणी नगर), दीपक मार्कंडेय राय (रा. नेहरूनगर, पिंपरी), सचिन रावताळे (रा. धावडेवस्ती, भोसरी) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
खुनाच्या गुन्ह्यात राहुल लांडगे याने परदेशी बनावटीचे (मेड इन इटली) पिस्तुल वापरले. याशिवाय घटनास्थळावर गोळीबार झाला असून, दोन रिकाम्या पुंगळ्या व एक लिड मिळालेली आहे. राहुलने किती गोळ्या फायर केल्या. याशिवाय अन्य तपासासाठी पोलिसांनी 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
No comments:
Post a Comment