Friday, 3 November 2017

भोसरी विधानसभा : राजकीय संघर्षाची पुनरावृत्ती होणार का?

पिंपरी चिंचवड मध्ये तीन विधानसभा मतदार संघ येत असले तरी शहरात सर्वाधिक ‘लक्षवेधी’ मतदारसंघ म्हणून भोसरी मतदार संघ पाहिले जाते. अर्थात त्याला कारण आहे इथले प्रतिस्पर्धी.. भोसरी म्हटले की नाव समोर येते ते विलास लांडे यांचे….! पिंपरी चिंचवडचे शरद पवार म्हणून ओळख असलेल्या लांडे यांचे ‘डावपेच’ नेमके काय? हे अनेकांना कोडे असते म्हणून या मतदार संघाकडे सर्वांचेच लक्ष असते..! पण त्यांच्या या डावपेचाला मागच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या आमदार महेश लांडगे यांनी ‘छेदले’ आणि अशक्यप्राय वाटणारा विजयश्री खेचून आणला.. त्याचमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते समोरासमोर आले तर राजकीय वातावरण पुरते तापणार यात शंका नसल्याने हा मतदार संघ कमालीचा लक्षवेधी ठरतोय..भोसरी विधानसभा मतदार संघातले आणखी एक नाव म्हणजे शिवसेना नेत्या सुलभा उबाळे…! शहरातला शिवसेनेचा एकमेव महिला चेहरा…! महेश लांडगे आणि विलास लांडे यांच्या सारख्या कडव्या प्रतिस्पर्ध्यांना तेवढ्याच धैर्याने त्यांनी तोंड दिले..! पण दुर्दैवाने त्यांना दोन वेळेला पराभवाचा सामना करावा लागला. आता महापालिका निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने आणि या पूर्वी दोनवेळा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांच्या नावाचा आगामी निवडणुकीत शिवसेना नेते किती विचार करतील हे सांगता येणे अवघड आहे. त्याचमुळे भोसरी मतदारसंघात सध्या लांडे आणि लांडगे हिच लढत होईल अशी चर्चा आहे.

No comments:

Post a Comment