पिंपरी विधानसभा मतदार संघातील संघटनात्मक बांधणी व बूथनिहाय पक्षाचा विस्तार वाढविण्यासाठी आकुर्डीतील एका खासगी हॉटेलमध्ये अचानक भाजप पदाधिका-यांची बैठक घेण्यात आली. यावेळी पिंपरी विधानसभेचे प्रभारी तथा सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे हे पिंपरी विधानसभेतील जुन्या-नव्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेत असताना भाजपचे निष्ठावंत माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांनी जून्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षाच्या विविध पदांचे वाटप करण्याची मागणी केली. यावरून शहर सरचिटणीस प्रमोद निसळ यांनी काही हातवारे व इशारे केल्याने, खाडे यांनी निसळ यांच्यावर निशाना साधत तुला माज आलाय का? अशी शिवराळ भाषा वापरल्याने दोघांमध्ये चांगलाच वाद पेटला. त्यांच्यातील वाद एवढा विकोपाला गेला की, दोघांनी एकमेकांची कॉलर पकडून शिवीगाळ केली. दरम्यान, नगरसेवक शितल शिंदे आणि अनुप मोरे यांनी मध्यस्थी करुन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिंपरीचे प्रभारी दिलीप कांबळे यांना या पदाधिकाऱ्यांचा चांगलाच अनुभव आल्याने त्यांनी अचानक बैठक पुढे ढकलली.
No comments:
Post a Comment