Saturday, 16 June 2012

पालिकेने कात टाकली

पालिकेने कात टाकली: पिंपरी । दि. १ (प्रतिनिधी)

महापालिका प्रशासनात विविध विभागांत महत्त्वाच्या पदावर काम करणार्‍या अधिकार्‍यांपैकी काही अधिकारी नवृत झाले. त्यांच्या रिक्त जागेवर नवीन अधिकार्‍यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम करणार्‍या अधिकार्‍यांच्या कामकाजात साचलेपणा आला होता. त्यांच्या जागी नवीन अधिकार्‍यांची नेमणूक झाली. आयुक्तपदीही डॉ. श्रीकर परदेशी रूजू झाले. प्रशासनाने कात टाकली असून कामकाजातील साचलेपणा दूर होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शासनाकडून प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आलेल्या अधिकार्‍यांना तीन वर्षांपेक्षा अधिक काळ मुदतवाढ देवू नये, असा कडाडून विरोध करून महापालिकेतील अधिकार्‍यांना पदोन्नती देऊन जबाबदारीच्या पदावर काम करण्याची संधी द्यावी, अशी भूमिका घेणार्‍या महापालिकेतील अधिकार्‍यांनी नवृत्तीनंतरही मुदतवाढीच्या माध्यमातून महापालिकेत सेवेची संधी मिळावी, अशी अपेक्षा बाळगली होती. त्यासाठी स्थायी समिती, सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळविण्याचा केविलवाना प्रयत्न केला होता. नुकत्याच नवृत झालेल्या मुख्य लेखापाल व्ही. टी. भोसले यांच्यासह मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजशेखर अय्यर, नगरसचिव सु. बा. काळे यांचा मुदतवाढीचा प्रस्ताव आयुक्त परदेशी यांनी फेटाळून लावला.

नवृत्तीनंतर महापालिकेत मानधन तत्त्वावर काम करण्याचे त्यांचे मनसुभे उधळून लावले. खरे तर नवृत्तीचा काळ जवळ येताच अधिकार्‍यांचे काउंटडाऊन सुरू झाले होते. नवृत झाल्यासारखीच त्यांच्या वागण्याची पद्धत होती. शेवटच्या काळात बालंट येऊ नये, याची त्यांनी विशेष खबरदारी घेतली होती. गत वर्षी ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. नागकुमार कुणचगी नवृत्त झाले, औषध खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे त्यांच्यावर आरोप होते. त्यामुळे नवृत्तीनंतरची देय रक्कम त्यांनी अद्याप दिलेली नाही, असे बालंट येऊ नये, म्हणून वर्षभरापासून डॉ. अय्यर दक्षता घेत होते. महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेपासून त्यांनी अलिप्तवादी भूमिका घेतली होती.

पोटघन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपांना सामोरे गेलेल्या व्ही.टी. भोसले यांना मुख्य लेखापालपदी काम करण्याची संधी मिळाली. तेसुद्धा नवृत्तीच्या काळापर्यंत कोणत्या प्रकरणात अडकू नये, याची दक्षता घेत होते. घड्याळाच्या काट्याबरोबर साडेपाचलाच कार्यालयाबाहेर पडणारे नगरसचिव सु.बा. काळे यांच्याही मनात नवृत्तीनंतर मुदतवाढ मिळावी, अशी अभिलाषा का असावी? असा प्रश्न या निमित्ताने नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.



आयुक्त लावणार शिस्त

अधिकारी, पदाधिकार्‍यांच्या संगनमताने सुरू असलेल्या मनमानी कार्यपद्धतीला रोखण्याचे पाऊल नवे आयुक्त डॉ.परदेशी यांनी उचलले आहे. नवृत होणार्‍या अधिकार्‍यांच्या मुदतवाढीच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवून त्यांनी आपल्या कार्यपद्धतीची झलक दाखवून दिली आहे. यापुढे असे प्रकार चालणार नाहित, याचे संकेत या निमित्ताने मिळाले आहेत. विविध विभागाच्या अधिकार्‍यांना, विभाग प्रमुखांना बोलावून ते कामकाजाचा आढावा घेत आहेत. सध्या आयुक्तांच्या दालनात रोज या आढावा बैठका होवू लागल्या आहेत. महापालिकेतील मनमानी कारभाराला आळा घालून प्रशासनाला ते शिस्त लावतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment