Saturday, 16 June 2012

पिंपरीकरांना नाही पेट्रोल दरवाढीची तमा

पिंपरीकरांना नाही पेट्रोल दरवाढीची तमा: वीरेंद्र विसाळ । दि. २५ (पुणे)

दुचाकींचे शहर असे बिरुद मिरविणार्‍या पुणेकरांना आणि उद्योगनगरी म्हणून लौकिक असणार्‍या पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांना पेट्रोल दरवाढीची काहीही तमा नाही. गेल्या दोन वर्षांत पेट्रोलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असताना पीएमपी प्रवाशांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. जानेवारी २0१२ मध्ये असलेल्या प्रवासी संख्येपेक्षा मार्चमधील संख्या एक लाखाने कमी झाली आहे. पीएमपीच्या सेवेबाबत अनेक तक्रारी मान्य करूनही गेल्या काही वर्षांत दुचाकींची संख्या पाहता पेट्रोलच्या दरवाढीचा जनतेवर काहीही परिणाम झालेला नाही, असेच आकडेवारीवरून दिसत आहे.

डिसेंबर २00७ मध्ये पीएमपीकडे ८ लाख प्रवासी होते. त्या वेळी प्रत्यक्ष मार्गावर सुरू असलेल्या बसची संख्या ९00 च्या घरात होती. त्यामुळे काही प्रमाणात प्रवाशांचे आणि बसचे समीकरण असंतुलित होते. त्यानंतर दोन वर्षांत प्रवाशांच्या संख्येने १२ लाखांचा आकडा गाठला. त्या प्रमाणात बसची संख्याही वाढविण्यात आली होती. जानेवारी २0१0 मध्ये प्रवाशांच्या संख्येने उच्चांक गाठला आणि संख्या १२ लाख ५0 हजारांच्या घरात पोहोचली. परंतु त्यानंतर मात्र पीएमपीला उतरती कळा लागली आणि प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय घट होण्यास सुरुवात झाली.

जानेवारी २0११ मध्ये पीएमपीकडे १ हजार २00 बस असताना प्रवासी संख्या १0 लाख ८0 हजारांच्या घरात होती. तर वर्षभरात बसमध्ये वाढ होऊनही जानेवारी २0१२ मध्ये संख्या ११ लाखांच्या घरात म्हणजेच २0 हजारांनीच वाढली. परंतु त्यानंतर मात्र मार्च २0१२ मध्ये हे चित्र पूर्णत: पालटले असून, काही महिन्यांतच ही संख्या एक लाखाने कमी झाली असून १0 लाखांवर आली आहे. त्यावरून दोन्ही शहरातील प्रवाशांना पेट्रोल दरवाढीची तमा नसल्याचे दिसते.

No comments:

Post a Comment